वैभववाडी (प्रतिनिधी) : विना परवाना वाळूची वाहतूक करणारा डंपर सायबर पोलीस सिंधुदुर्ग यांनी जप्त केला. या कारवाईत सुमारे तीन ब्रास सिलिका वाळूसह तब्बल ४ लाख ६२ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला. ही कारवाई शुक्रवारी रात्री साडेनऊच्या सुमारास कोकिसरे रेल्वे फाटकाजवळ करण्यात आली.
सिंधुदुर्गचे पोलीस अधीक्षक यांच्या आदेशानुसार पोलिसांकडून ऑलआऊट ऑपरेशन राबविण्यात येत होते. यावेळी सायबर ठाणेचे पोलीस निरीक्षक दत्ता भोसले, पोलीस शिपाई पोहेकर तसेच सरकारी वाहनाचे चालक यांच्या पथकाने ओरोस, कणकवलीमार्गे वैभववाडीच्या दिशेने पेट्रोलिंग सुरू होते. रात्री ९ वाजता कोकिसरे रेल्वे फाटकाजवळ संशयास्पद डंपर कोल्हापूरच्या दिशेने जाताना दिसला. पोलिसांनी त्याला थांबवून तपासणी केली असता डंपरमध्ये सिलिका वाळू भरलेली आढळून आली.
डंपर चालक संजीवकुमार इरप्पा तेलगाव (५०, रा. टोप, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) याच्याकडे वाळू वाहतुकीचा परवाना व शासनाची परवानगी याबाबत विचारणा केली असता त्याच्याकडे कोणताही परवाना नसल्याचे समोर आले. त्यामुळे परवानगीविना वाळूची वाहतूक करून शासनाची फसवणूक केल्याचा संशय आल्याने पोलिसांनी डंपर ताब्यात घेतला.
पोलिसांनी केलेल्या पंचनाम्यानुसार डंपरची अंदाजे किंमत ४ लाख ५० हजार रुपये असून त्यामध्ये सुमारे १२ हजार रुपये किमतीची तीन ब्रास सिलिका वाळू आढळली. याप्रकरणी वैभववाडी पोलीस ठाण्यात चालकाविरुद्ध कायदेशीर फिर्याद स्नेहल दत्ताराम जावकर महिला पोलीस कॉन्स्टेबल यांनी दाखल केली. याप्रकरणी भारतीय संहिता खान आणि खनिज अधिनियम कलम 21 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.












