ब्युरो न्युज (मुंबई) : मुंबईतल्या झोपडपट्टीधारकांसाठीदिलासा देणारी बातमी आहे. 1 जानेवारी 2000 ते 1 जानेवारी 2011 या काळातील झोपडीधारकांना आता हक्काचं घर मिळणार आहे. गृहनिर्माण मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा मोठा निर्णय घेतला आहे. झोपडीच्या बदल्यात अवघ्या 2 लाख 50 हजार रुपयात पक्कं घर मिळणार आहे. शासनाकडून पुनर्वसन सदनिकेची किंमत अडीच लाख रुपये निश्चित करण्यात आली आहे. या निर्णयामुळे लाखो झोपडपट्टीधारकांना फायदा होणार आहे.
राज्य सरकारने झोपडपट्टी क्षेत्र सुधारणा, निर्मूलन व पुनर्वसन अधिनियम 1971 मधील तरतूदी नुसार राज्यातील महापालिका, नगरपालिकेतील
1 जानेवारी 2000 ते 1 जानेवारी 2011 दरम्यानच्या झोपडीधारकांचं सशुक्ल पुनर्वसन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एसआरए योजनेत सशुक्ल पुनर्वसनाला पात्र ठरणाऱ्या झोपडीधारकांना पात्र करून त्यांच्याकडून वसूल करावयाच्या सदनिकेची किंमत ठरविण्यासाठी गृहनिर्माण विभागाने 7 सप्टेंबर 2018 रोजी परिपत्रक काढलं होतं.
एसआरएतील झोपडीधारकांचे पुनर्वसन करताना त्यांच्या सदनिकेची किंमत निश्चित करताना प्रकल्पातील पुनर्वसन घटकाच्या एकूण बांधकाम खर्च, प्रकल्पातील प्रस्तावित केलेल्या अत्यावश्यक आणि अन्य पायाभूत सुविधांच्या विकासासाठी येणारा खर्च, एसआरएचा स्थिर दराचा इतर प्रशासकीय खर्च या तीन निकषांचा विचार करून एसआरएचे मुख्य अधिकारी किंमत जाहीर करतील असे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार शासनाकडून पुनर्वसन सदनिकेची किंमत अडीच लाख रुपये निश्चित करण्यात आली आहे. शासन निर्णय जारी झाल्याने लाखो झोपडपट्टीवासियांच्या घराचे स्वप्न साकार होणार आहे.