चेक बाऊन्स गुन्ह्यातील अपिलात आरोपी संतोष लुडबे ची शिक्षा कायम

जिल्हा न्यायालयाकडून कॅथॉलिक अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसायटीच्या बाजूने निकाल

वेंगुर्ले (प्रतिनिधी) : कॅथोलिक अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी यांनी दाखल केलेल्या धनादेश अनादराच्या खटल्यात आरोपी संतोष लुडबे, रा. आजगांव यांना वेंगुर्ला न्यायालयाने सुनावलेल्या शिक्षेविरोधात दाखल केलेले अपील अतिरिक्त प्रधान जिल्हा न्यायाधीश क्र.२, इंदलकर यांनी दिनांक १४ ऑक्टोबर २०२६ रोजी फेटाळून लावले. या प्रकरणात संस्थेतर्फे अॅड. अमोल मालवणकर व अॅड. सुरेंद्र तेली यांनी काम पाहिले.

कॅथोलिक अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी शाखा शिरोडा मधुन संतोष लुडबे यांनी कर्ज घेतले होते. या कर्जाच्या अंशतः परत फेडीकरीता त्यांनी रु. १,३४,५००/- चा चेक दिला होता. मात्र या धनादेशाचा अनादर झाल्याने कॅथोलिक अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी यांनी चलनक्षम दस्तऐवजाच्या अधिनियमाच्या कलम १३८ अन्वये वेंगुर्ला न्यायालयात फौजदारी खटला दाखल केला होता. या खटल्यात वेंगुर्ला येथील कनिष्ठ न्यायालयाने आरोपी संतोष लुडबे यांना दोन महिन्यांच्या कारावासाची शिक्षा सुनावली होती. तसेच दंड रु. १,३४,५००/- ही रक्कम ३० दिवसांच्या आत अदा करण्याचे आदेश दिले होते. ही रक्कम मुदतीत न भरल्यास १५ दिवसांचा साधा कारावास भोगण्याची तरतूद करण्यात आली होती. याशिवाय ५ हजार रुपये दंड ३० दिवसांच्या आत भरण्याचे आदेश देण्यात आले होते. दंडाची रक्कम न भरल्यास आणखी १५ दिवसांचा साधा कारावास भोगावा लागणार होता. कनिष्ठ न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात आरोपीने अपील दाखल केले होते. मात्र, फिर्यादी यांचेवतीने युक्तीवाद सादर करताना कर्जविषयक नोंदी, कर्जदाराने भरलेल्या रक्कमांचा योग्य हिशोब ठेवणे, व्याजासंदर्भातील कायदेशिर तरतुदी व नियम सादर करणे, तसेच कर्जखात्यातील प्रत्यक्ष देय रक्कमेचा निश्चित हिशोब दाखविणे या बाबी न्यायालयाच्या निदर्शनास आणुन देण्यात आल्या. न्यायालयाने फिर्यादीच्यावतीने मांडलेल्या बाबी विचारात मा. अतिरिक्त प्रधान जिल्हा न्यायाधीश क्र. २, श्री. इंदलकर यांनी हे अपील फेटाळल्याने कनिष्ठ न्यायालयाच्या निर्णयाला दुजोरा मिळाला आहे.

error: Content is protected !!