वेदिका विशाल परब,संध्या तेरसे यांच्या हस्ते सत्कार
वेंगुर्ले (प्रतिनिधी) : महिला उद्योजिकांच्या कार्याला प्रोत्साहन देऊन त्यांच्या व्यावसायिक वाटचालीचा गौरव करण्याच्या उद्देशाने इनरव्हील क्लब ऑफ वेंगुर्ला आणि लक्ष्मी आधार सेवा फाउंडेशन, वेंगुर्ला यांच्या संयुक्त विद्यमाने महिला उद्योजिकांचा सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमात प्रणया भोसले, स्मिता कासले, भाग्यलक्ष्मी घारे, ज्योती देसाई, सीमा नाईक, सुजाता संदीप देसाई, अक्षता साळगावकर, करिष्मा सोसुरकर, सारिका काळसेकर, सीमा मराठे, प्रणाली अंधारी आणि अस्मिता कुंभार या बारा महिला उद्योजिकांचा मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. वेदिका विशाल परब आणि संध्या तेरसे यांच्या हस्ते हे मानपत्र प्रदान करण्यात आले.
महिलांनी केवळ नोकरीच्या संधींच्या मागे न लागता स्वतःचा व्यवसाय उभा करून स्वावलंबी बनावे, तसेच आपल्या व्यवसायाच्या माध्यमातून इतरांनाही रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश होता. स्थानिक पातळीवर विविध व्यवसायांच्या माध्यमातून स्वतःची ओळख निर्माण करणाऱ्या महिलांच्या जिद्द, मेहनत आणि उद्योजकीय दृष्टिकोनाचे यावेळी कौतुक करण्यात आले.
यावेळी लक्ष्मी आधार सेवा फाउंडेशनच्या अध्यक्षा ज्योती देसाई, सचिव वृंदा गवंडळकर, खजिनदार डॉ. दिपाली देसाई, सदस्य शुभदा नवार, आकांक्षा परब, काजल गिरप आणि दिपाली अभ्यंकर उपस्थित होत्या.
तसेच इनरव्हील क्लब ऑफ वेंगुर्लाच्या सचिव श्रीया परब, उपाध्यक्ष सई चव्हाण, आरती गिरप, सदस्य रसिका मठकर, ॲड. अनुराधा वेर्णेकर, वैभवी दाभोलकर आणि हर्षदा शिरसाट उपस्थित होत्या.
महिला उद्योजिकांचा सन्मान करून त्यांच्या कार्याला प्रोत्साहन देण्याचा हा उपक्रम उपस्थितांसाठी प्रेरणादायी ठरला.












