जिल्हा परिषदेत खाद्यपदार्थ महोत्सवाचे उद्घाटन; लाडू, करंज्या, चकलीसह दिवाळी साहित्याची रेलचेल; ५ नोव्हेंबरपर्यंत विक्री
ओरोस (प्रतिनिधी) : दिवाळीचा गोडवा वाढविण्याबरोबरच ग्रामीण भागातील महिलांच्या आर्थिक स्वावलंबनाला हातभार लावण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेत आजपासून (ता. २) ‘खाद्यपदार्थ महोत्सव २०२६’ला प्रारंभ झाला. उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत जिल्ह्यातील महिला स्वयंसहाय्यता समूहांनी तयार केलेले विविध प्रकारचे फराळाचे पदार्थ, पणत्या, आकाशकंदील आणि सजावटीच्या वस्तू या महोत्सवात विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहेत. या माध्यमातून ग्रामीण महिलांच्या उद्यमशीलतेला बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न असून, नागरिकांनी महिला बचत गटांच्या उत्पादनांना प्राधान्य देऊन त्यांच्या आर्थिक सक्षमीकरणाला हातभार लावावा, असे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांनी केले.
जिल्हा परिषदेत आयोजित या महोत्सवाचे उद्घाटन अध्यक्ष कामत यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व फीत कापून करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अपूर्वा बासुर, जिल्हा परिषद सदस्य गोट्या सावंत, मनोज रावराणे, सुमेधा पाताडे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक उदय पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी जयप्रकाश परब, जिल्हा समन्वयक वैभव पवार आदी उपस्थित होते.
उमेद अभियानांतर्गत दरवर्षीप्रमाणे यंदाही या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. आजपासून ५ नोव्हेंबरपर्यंत चालणाऱ्या या महोत्सवात जिल्ह्यातील विविध स्वयंसहाय्यता समूहांनी सहभाग नोंदविला आहे. महिलांनी स्वतः तयार केलेले लाडू, करंज्या, चकली, चिवडा, पोहे यांसह विविध खाद्यपदार्थ विक्रीसाठी उपलब्ध आहेत. याशिवाय दिवाळीसाठी लागणाऱ्या मेणबत्त्या, आकर्षक पणत्या, आकाशकंदील आणि विविध वस्तूंचे स्टॉलही उभारण्यात आले आहेत.
उद्घाटनानंतर अध्यक्ष कामत, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बासुर यांच्यासह उपस्थित मान्यवरांनी सर्व स्टॉलना भेटी दिल्या. महिलांनी तयार केलेल्या खाद्यपदार्थांची आणि विविध वस्तूंची माहिती घेत त्यांच्या उपक्रमांचे कौतुक केले. ग्रामीण भागातील महिला बचत गटांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी अशा विक्री उपक्रमांना प्रोत्साहन मिळणे आवश्यक असल्याचे यावेळी सांगण्यात आले. जिल्हा परिषद अधिकारी, कर्मचारी, लोकप्रतिनिधी आणि नागरिकांनी या महोत्सवाला भेट देऊन महिलांनी तयार केलेल्या वस्तूंची खरेदी करावी, असे आवाहनही करण्यात आले.












