सर्व संचालकांना बोलवण्याचे आणि १० नोव्हेंबर ला अध्यक्ष निवडीची प्रक्रिया पूर्ण करण्याचे सक्त आदेश
कोल्हापूर (प्रतिनिधी) : बहुचर्चित गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदाच्या निवडणूक प्रक्रियेत खोडा घातल्याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने महायुती आणि निवडणूक निर्णय अधिकारी यांना चांगलेच फटकारले आहे. न्यायालयाने निवडणूक अधिकाऱ्यांना ७ दिवसांची नोटीस बजावून सर्व संचालकांना बोलवण्याचे आणि १० नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता अध्यक्ष निवडीची प्रक्रिया पूर्ण करण्याचे सक्त आदेश दिले आहेत.
गोकुळच्या नियमाप्रमाणे अध्यक्ष निवडीसाठी तीन वेळा सभा बोलावता येते, मात्र तिन्ही वेळा एखादा संचालक गैरहजर राहिल्यास त्याचे संचालक पद आपोआप रद्द होते. त्यामुळे १० नोव्हेंबरची ही दुसरी सभा अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. या सभेला महायुतीचे १२ संचालक हजर राहणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. २९ ऑक्टोबर रोजी गणपूर्तीसाठी (१४ संचालक) आवश्यक संख्या नसल्याने सभा तहकूब झाली होती. महायुतीचे १२ संचालक गैरहजर राहिल्याने कोरम पूर्ण झाला नव्हता. त्यानंतर बहुमताचा दावा करत आमदार सतेज पाटील यांच्या समविचारी आघाडीच्या १३ संचालकांनी समांतर सभा घेऊन शशिकांत पाटील चुयेकर यांची अध्यक्षपदी निवड जाहीर केली होती. या समांतर निवडीला आव्हान देणारी याचिका कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये दाखल झाली होती, त्यावर न्यायालयाने हा आदेश दिला आहे.












