शेंडा पार्क येथील रुग्णालयाच्या उद्घाटनासाठी केंद्रीय गृहमंत्र्यांना आणणार – मंत्री हसन मुश्रीफ

कोल्हापूर (प्रतिनिधी) : वैद्यकीय शिक्षण विभागातर्फे शहरातील शेंडा पार्क येथे उभारण्यात येणाऱ्या 600 जनरल बेड हॉस्पीटलच्या उद्घाटनासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना आणण्याचा मानस असल्याचे प्रतिपादन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.

शेंडा पार्क येथे उभारण्यात येत असलेल्या 600 जनरल बेड,250 कॅन्सर व 250 सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या बांधकामासह सांगाव येथील आयुर्वेदिक / होमिओपॅथिक , उत्तुर येथील शासकीय योग व निसर्गोपचार तसेच CPR रुग्णालयाती प्रलंबित कामकाजाचा आढावा श्री मुश्रीफ यांनी आज घेतला. यावेळी वैद्यकीय अधिष्ठाता डॉ सदानंद भिसे,सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता तुषार बुरुड,उप अधीक्षक डॉ.गिरीष कांबळे प्रामुख्याने उपस्थित होते.

मुश्रीफ म्हणाले, या ठिकाणी सुरू असलेली बांधकामे 31 मार्च पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश संबंधित कंत्राटदारांना दिले आहेत.मौजे सांगाव येथे शासकीय आयुर्वेदिक व होमिओपॅथिक महाविद्यालयाच्या प्रत्येकी100 विद्यार्थी पट संख्येला मान्यता मिळाली असून या प्रवेश प्रक्रियेला प्रारंभ झाला आहे. तसेच मौजे उत्तुर या ठिकाणी उभारण्यात येत असलेल्या राज्यातील पहिल्या शासकीय योग व निसर्गोपचार महाविद्यालयाच्या तिसऱ्या तुकडीच्या प्रवेशाला प्रारंभ झाला आहे.यापूर्वी सन 24 – 25 ; 25-26 या वर्षाकरीता 60 विद्यार्थी क्षमता असणाऱ्या तुकडीला (बॅच) प्रवेश देण्यात आला असून त्यांचे त्या ठिकाणी अध्यापन सुरु आहे. तसेच सन 2026-27 या वर्षाकरिता प्रवेश देणे सुरु आहे. सुमारे 20 एकर इतक्या जागेवर उभारण्यात येणाऱ्या या ठिकाणी 60 बेडचे अद्ययावत हॉस्पिटल व इतर 10 बेड राखीव ठेवण्यात येणार असून त्यातील 4 बेड हे अति महत्त्वाच्या व्यक्तींसाठी राखीव राहणार आहेत. तसेच एका वेळेस किमान 1 हजार बाह्य रुग्ण या ठिकाणी उपचार घेऊ शकतील अशी व्यवस्था या ठिकाणी निर्माण करण्यात येणार आहे.

भविष्यात कोल्हापूर हे मेडिकल हब म्हणून ओळखले जाईल. या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्रासह लगतच्या कर्नाटक व गोवा राज्यातील रुग्णही उपचारासाठी येतील. या मेडिकल हबमुळे लवकरच कोल्हापूरची राज्यातच नव्हे तर देशात एक वेगळी ओळख निर्माण होण्यास मदत होईल असा आशावादही श्री मुश्रीफ यांनी यावेळी व्यक्त केला

या आढावा बैठकीसाठी आयुर्वेदिक होमिओपॅथिक महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अभिजीत अहिरे शासकीय योग व निसर्गोपचार महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ.भाग्यश्री खोत,डॉ.भूषण मिरजे,सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता क्रांतीकुमार मिरजकर,बाबुराव हजारे यांच्यासह कंत्राटदार व वैद्यकीय तसेच संबंधित विभागाचे इतर अधिकारी-पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!