वैभववाडीतील अपरिचित ऐनारी बौद्ध लेणीवर एकदिवसीय कार्यशाळा उत्साहात संपन्न!

दुर्गम डोंगररांगांतील प्राचीन बौद्ध वारशाच्या अभ्यासासह संवर्धनाचा संकल्प

वैभववाडी (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील ऐनारी गावातील अपरिचित बौद्ध लेणीच्या ऐतिहासिक वारशाचा अभ्यास करण्यासाठी रविवार, दि. १ नोव्हेंबर २०२६ रोजी एकदिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. समुद्रसपाटीपासून सुमारे १,६०० फूट उंचीवर दुर्गम डोंगररांगांमध्ये असलेल्या या लेणीपर्यंत पोहोचण्यासाठी सुयोग्य मार्ग नसल्याने हा वारसा आजही दुर्लक्षित आहे. या कार्यशाळेत एकजूट लेणी अभ्यास प्रचार प्रसार समूह, युवा बौद्ध धम्म परिषद (कोल्हापूर), मूर्ती आणि शिल्प संशोधन संस्था (छत्रपती संभाजीनगर) आणि गडहिंग्लज तालुका लेणी संवर्धक संघाचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. या उपक्रमासाठी कोल्हापूरचे दीपक कांबळे, अजित कांबळे, व मुंबईचे सारिष डोळस, प्रफुल्ल पुरळकर यांनी पुढाकार घेतला. स्थानिक मार्गदर्शक दिलीप पांचाळ व सीताराम गुरव यांचे सहकार्य लाभले. ऐनारीचे उपसरपंच संजयजी कांबळे यांनी सहभागी अभ्यासकांसाठी अल्पोपहार व विश्रांतीची व्यवस्था केली. तसेच त्यांचा संविधान प्रास्ताविक फोटो फ्रेम देऊन सत्कार करण्यात आला. कार्यशाळेचे प्रास्ताविक प्रा. संतोष भोसले यांनी केले. समारोपप्रसंगी सारिष डोळस यांनी सर्वांनी एकत्रितपणे लेणी परिसराची स्वच्छता, प्रसिद्धी आणि संवर्धनासाठी वेगाने प्रयत्न करण्याचे आवाहन केले. एकजूट लेणी समूहाच्या वतीने सर्वांचे आभार मानून कार्यशाळेची सांगता करण्यात आली. अपरिचित बौद्ध वारशाचा शोध, अभ्यास, दस्तऐवजीकरण आणि संवर्धनासाठी सामूहिक प्रयत्नांची नवी दिशा देणारा हा उपक्रम ठरला.

error: Content is protected !!