कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या गोकुळ दूध संघाच्या निवडणुका आणि त्यानंतरच्या विजयानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विजयानंतर केलेल्या भाषणामुळे कोल्हापुरात एका नव्या वादाला तोंड फुटले आहे. याच पार्श्वभूमीवर आता आमदार राजेश क्षीरसागर यांनी या राजकीय वादात उडी घेत चंद्रकांत पाटील यांची अत्यंत खंबीरपणे पाठराखण केली आहे. एवढेच नव्हे तर त्यांनी थेट नाव न घेता आमदार सतेज पाटील यांच्यावर कडक शब्दांत ताशेरे ओढले आहेत. त्यामुळे आगामी काळात जिल्ह्यातील राजकीय संघर्ष अधिकच तीव्र होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
शहरातील गांधी मैदान येथे एका पाहणी दौऱ्यासाठी आले असता आमदार राजेश क्षीरसागर यांनी माध्यमांशी संवाद साधला. केवळ समाजमाध्यमांवर स्वतःची प्रतिमा उंचावण्यासाठी यंत्रणा राबवली म्हणजे मंत्री चंद्रकांत पाटील हे चुकीचे ठरत नाहीत असे ते म्हणाले. शासनाकडून अत्यंत नाममात्र दराने म्हणजे अवघ्या एका रुपयाने जागा लाटायच्या आणि तिथे चुकीच्या पद्धतीने हॉटेल्स उभी करायची, असा गंभीर आरोप त्यांनी केला. तसेच या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर देणग्या घेतल्या जात असल्याचा दावा त्यांनी केला. भूतकाळ उकरायला सुरुवात केली तर अनेक धक्कादायक गोष्टी उजेडात येतील असा कडक इशारा त्यांनी सतेज पाटील यांना अप्रत्यक्षपणे दिला आहे.
गोकुळ च्या निकालानंतर मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावरील टीकेला उत्तर देताना राजेश क्षीरसागर यांनी त्यांची भक्कम बाजू मांडली. चंद्रकांत पाटील हे राज्याचे एक प्रगल्भ नेते असून ते सर्व घटकांना सोबत घेऊन जाणारे व्यक्तिमत्त्व आहे असे ते म्हणाले. मुख्यमंत्र्यांच्या खांद्यावर बसलेले फोटो जर तुम्ही तयार करून अवमान करत असाल, तर त्याला तशाच भाषेत प्रत्युत्तर मिळणे स्वाभाविक आहे. त्यामुळे त्यांनी जे काही भाष्य केले त्यात कोणतीही चूक नाही असे ठाम मत त्यांनी व्यक्त केले. राजकारणात आरोप प्रत्यारोप होत असले तरी त्याला एक निश्चित मर्यादा असायला हवी अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
आपल्या राजकीय संघर्षाची आठवण करून देताना राजेश क्षीरसागर यांनी २०१९ मधील पराभवाचा दाखला दिला. पराभवानंतर आपण नव्याने कामाला लागलो होतो मात्र त्यावेळी समाजमाध्यमांवर आपल्याविरुद्ध जाणीवपूर्वक नकारात्मक मोहीम राबवण्यात आली होती. या प्रचारामुळे कौटुंबिक जीवनातही वाद निर्माण झाले होते असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले. त्यांच्याकडे डी. वाय. पाटील ग्रुप सारख्या संस्था हाताशी असल्याने त्यांच्याकडून दिशाभूल करणारे संदेश सतत पसरवले जातात. परंतु केवळ अशा पद्धतीने समाजमाध्यमे हाताळली म्हणजे मंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रतिमा मलिन होऊ शकत नाही असे त्यांनी ठणकावून सांगितले.
याचबरोबर मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चेवरही आमदार राजेश क्षीरसागर यांनी आपले मत मांडले. मंत्रिमंडळातील संभाव्य बदलांबाबत सध्यातरी कोणतीही पूर्वकल्पना नसल्याचे त्यांनी नमूद केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी पहिल्या अडीच वर्षांच्या काळात काहींना आणि उर्वरित काळात इतर ज्येष्ठ नेत्यांना संधी देण्याचे धोरण ठरवले होते. आपण पक्षाशी नेहमीच एकनिष्ठ राहिलो असून पक्षविरोधी भूमिका घेतलेली नाही. त्यामुळे केवळ मलाच नव्हे तर पक्षातील सर्व ज्येष्ठ नेत्यांना मंत्री पदाची योग्य ती संधी मिळायला हवी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.












