एकूण ४० रुग्णांनी घेतला लाभ तर १० रुग्णांची करण्यात येणार मोफत शस्त्रक्रिया
खारेपाटण (प्रतिनिधी) : डॉ.गद्रे रुग्णालय व मोतीबिंदू शस्त्रक्रिया सेंटर कणकवली व कुरंगावणे – बेर्ले ग्रूप ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने कुरंगावणे ग्रामपंचायत कार्यालय येथे शुक्रवार दि.१३ नोव्हेंबर २०२६ रोजी येथील नागरिकांसाठी मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. कुरंगावणे सरपंच पप्पू ब्रम्हदंडे यांच्या अध्यक्षते खाली संपन्न झालेल्या या शिबिराच्या शुभारंभ प्रसंगी जिल्हा परिषद सिंधुदुर्ग चे माजी बांधकाम व वित्त सभापती रवींद्र उर्फ बाळा जठार, खारेपाटण जि. प. सदस्या प्राची ईसवलकर, तळेरे पं.स. सदस्य श्री राजेश जाधव, कुरंगावणे उपसरपंच बाबला गोसावी, माजी उपसरपंच बबलू पवार, ग्रा.पं. सदस्य विशाखा राऊत, रवींद्र पवार, अक्षदा सादीकले, स्नेहा गोसावी, सारिका कुडाळकर ग्रामविकास अधिकारी गिरीश धुमाळे, यांसह ग्रामपंचायत कर्मचारी राजेंद्र लाड, अंकुश सादीकले, सचिन कदम व ग्रामस्थ उपस्थित होते.
ग्रामपंचायतच्या १५ वित्त आयोग निधीतून राबविण्यात आलेल्या या मोफत नेत्र तपासणी शिबिरात गावातील सुमारे ४० महिला पुरुष नागरिकांनी लाभ घेतला.तर यामधून १० रुग्णांची शस्त्रक्रियेसाठी निवड करण्यात आली असून त्यांच्यावर डॉ.गद्रे नेत्र रुग्णालय येथे मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. या शिबिरासाठी कणकवली भाजपा तालुका अध्यक्ष दिलीप तळेकर यांचे विशेष सहकार्य लाभले.
“गावचा सरपंच होऊन सर्वसामान्य गरीब माणसांची सेवा करण्याची संधी मिळाली. हे मी माझे भाग्य समजतो.अशा भावना यावेळी सरपंच पप्पू ब्रम्हदंडे यांनी व्यक्त केल्या. तर या शिबिराच्या माध्यमातून सामाजिक उपक्रमांद्वारे कुरगावणे ग्रामपंचायत ने नागरिकांना एक चांगली सेवा दिली असल्याची प्रतिक्रिया रवींद्र जठार यांनी यावेळी व्यक्त केली.












