कोल्हापूर (रोहन भिऊंगडे) : करवीर तालुक्यात एक दुर्दैवी घटना. नातेवाईकाच्या लग्नासाठी सासरवाडीत गेलेल्या तरुणाचा हळदी कार्यक्रमावेळी पाण्याच्या शॉवरमधून विजेचा शॉक लागल्याने मृत्यू झाला आहे. ज्योतिबा विठ्ठल कांबळे असं मृत युवकाचं नाव असून तो कोल्हापूरातील एका वृत्तसंस्थेत नोकरीला होता. सर्वांशी नेहमी हसतमुखाने आणि प्रेमाने वागणाऱ्या तरुणाच्या निधनाने हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेली माहिती अशी की, कोल्हापुरातील करवीर तालुक्यातील निगवे दुमाला येथे सासरवाडीतील नातेवाईकाच्या लग्नापूर्वी हळदीच्या कार्यक्रमासाठी ज्योतिबा विठ्ठल कांबळे (वय ३७, सध्या रा. कानाननगर, कोल्हापूर, मूळ रा. कोवाड, ता. चंदगड, जि. कोल्हापूर) गेला होता. जावई असलेला ज्योतिबा सपत्नीक तीन मुलांसह लग्नासाठी निगवे येथे आला. बुधवारी रात्री हळदीचा कार्यक्रम होता. यासाठी दारात शॉवरची व्यवस्था करण्यात आली होती. तर शॉवरमध्ये बल्ब लावण्यात आला होता. यावेळी अचानक बल्बमध्ये करंट उतरल्याने शॉवरसाठी लावलेल्या लोखंडी पाईपाला धरून थांबलेल्या जोतिबाला विजेचा धक्का बसला. त्यामुळे जोतिबाने जागीच प्राण सोडले, तसंच इतर दोघे किरकोळ जखमी झाले.
नातेवाईकांनी तातडीने ज्योतिबा कांबळे याला सीपीआर रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले. ज्योतिबाच्या पश्चात पत्नी, दोन मुली, चार महिन्यांचा मुलगा, आई, वडील असा परिवार आहे. तो कोल्हापुरातील एका वृत्तसंस्थेत ऑफिस बॉय होता. गेल्या २० वर्षांपासून तो वृत्तसंस्थेत काम करत होता. त्याच्या अकाली निधनाने शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.