कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर प्रेस क्लब आणि सेवा रुग्णालयाच्या वतीने आयोजित दोन दिवसीय आरोग्य शिबिरात ८० हुन अधिक पत्रकार आणि कुटुंबियांनी लाभ घेतला.आरोग्य उपसंचालक प्रेमचंद कांबळे,प्र.आरोग्य उपसंचालक उज्वला माने,प्रभारी शल्यचिकित्सक डाॅ.संगीता थोरात यांच्यासह कसबा बावडा येथील सेवा रूग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डाॅ.दिलीप वाडकर,डाॅ.उमेश कदम,डाॅ.सी.एल. कदम आदींनी यासाठी विशेष परिश्रम घेतले.
कामाच्या सततच्या वाढत्या ताणामुळे स्वतःसह कुटुंबियांच्या आरोग्याकडे होणारे दुर्लक्ष पाहता, अनेक गंभीर आजाराला पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबीयांना तोंड द्यावे लागते.यापार्श्वभुमीवर कोल्हापूर प्रेस क्लबच्या पुढाकारातुन कसबा बावडा येथील शासकीय सेवा रुग्णालयात गुरुवार दि.२६ व शुक्रवार दि.२६ मे या दोन दिवसीय आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले.
यामध्ये कान,नाक,घसा,डोळे,रक्त,लघवी,युरिक ॲसिड,सीबीसी,शुगर,थाॅयराईड,कोलेस्टेरॉल,
बीपी,ईसीजी,एक्सरे आदी तपासणी करण्यात आली.याशिवाय अर्थोपेडीक,स्रीरोग,सर्जन, त्वचारोग,आयुर्वेदिक,होमिओपॅथिक आदी आरोग्य सुविधाही उपलब्ध करून देण्यात आल्या .यावेळी प्रत्येक पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी महिनाभरासाठी विविध जीवन सत्व गोळ्या,टॉनिक,जखमेवरील मलम,कान व डोळ्यांचे ड्राॅप्स तसेच सर्दी खोकल्याची औषधे मोफत देण्यात आली.तसेच लवकरच इको, सोनोग्राफी आदींचीही तपासणी करण्यात येणार आहे.
या आरोग्य शिबिरासाठी पत्रकार दिपक जाधव, मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे कोल्हापूर जिल्हा प्रमुख प्रशांत साळोखे,यांच्यासह अल्पोपहाराची व्यवस्था करणारे सामाजिक कार्यकर्ते निवास जाधव,एस.जे.फौंडेशनचे सहकार्य लाभले.कोल्हापूर प्रेस क्लबच्या वतीने अध्यक्ष शीतल धनवडे यांनी सर्वांचे आभार मानले.
दर सहा महिन्यांनी होणार आरोग्य शिबिर
पत्रकारांची धावपळ पाहता सेवा रुग्णालयाच्या वतीने दर सहा महिन्यांनी पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी महाआरोग्य शिबिर घेण्यास सेवा रुग्णालय सदैव तयार असल्याची ग्वाही यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर उमेश कदम आणि डॉक्टर दिलीप वाडकर यांनी दिली.