पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते सोमवारी उद्घाटन
उत्पादन वाढीसाठी शेतकऱ्यांना होणार तृणधान्य बियाण्यांचे वाटप
सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 च्या निमित्ताने महाराष्ट्र शासन कृषी विभाग, जिल्हा परिषद कृषी विभाग, सिंधु आत्मनिर्भर अभियान, सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि स्नेहसिंधू कृषी पदवीधर संघ यांच्या संयुक्त विद्यमाने सिंधुदुर्ग भरड धान्य अभियान उपक्रम राबविण्यात येत आहे. उद्या सोमवार दि. 29 मे रोजी सकाळी 11 वा. नवीन जिल्हा नियोजन समिती सभागृहात जिल्हास्तरीय पौष्टिक तृणधान्य महत्व जनजागृती कार्यक्रम होणार आहे. पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते या कार्यक्रमांचे उद्घाटन होत असून, जिल्ह्यातील शेतकऱ्यांना प्रातिनिधिक स्वरुपात बियाण्यांचे वाटप होणार आहे.
शेतकऱ्यांना वाटप करण्यात येणाऱ्या बियाण्यांमध्ये नाचणी, कांग, सावा, कोडो, छोटे वरी, ब्राऊन टॉप यांचा समावेश आहे. यासाठी जवळपास 5 टन बियाणे गोळा करण्यात आले आहे.
काही वर्षांपूर्वी आपल्या सर्वांच्या आहारात भरड धान्यांचा समावेश होता. बदलत्या काळात तो कमी-कमी होत गेला. काही ठिकाणी भरड धान्यांचा वापर आहारातून बाजूला गेला आहे. या पौष्टिक भरड धान्यांचा आहारात वापर होण्याच्या दृष्टीकोनातून आंतरराष्ट्रीय वर्ष साजरे केले जात आहे. पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या संकल्पनेतून जनजागृती होण्याच्या दृष्टीने आणि आहारातील पौष्टिक भरड ध्यान्यांचे महत्व समजण्यासाठी जिल्हास्तरीय पौष्टिक तृणधान्य जनजागृती कार्यक्रम होत आहे.
अशा पौष्टिक भरड धान्यांचे उत्पादन वाढविण्याच्या दृष्टीकोनातून शेतकऱ्यांना बियांण्यांचे वाटप करण्यात येणार आहे. अशा पौष्टिक भरड धान्यांचा आहारातील महत्व यावर डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापिठाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. योगेश परुळेकर यांचे व्याख्यान होणार आहे. त्याचबरोबर यावेळी भरड धान्यांच्या महत्वाविषयी चित्रफितही दाखविण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाला सर्व लोक प्रतिनिधी जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, पोलस अधीक्षक सौरभ अग्रवाल आदी उपस्थित राहणार आहेत. तरी या कार्यक्रमांला शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजयकुमार राऊत यांनी केले आहे.