वैभववाडी बस स्थानकचे वाहतूक नियंत्रक, बस चालक, वाहक, सफाई कामगार यांच्या प्रती व्यक्त केली कृतज्ञता
वैभववाडी (प्रतिनिधी) : एस.टी.महामंडळाच्या अमृत महोत्सवी वर्धापन दिनानिमित्त वैभववाडी एस.टी.बस स्थानकमध्ये ग्राहक पंचायत महाराष्ट्र-वैभववाडी तालुका शाखेच्यावतीने कार्यक्रम घेण्यात आला. १ जून, १९४८ रोजी एस.टी महामंडळाची पहिली गाडी पुणे ते अहमदनगर या मार्गावर धावली. या पहिल्या गाडीचे चालक तुकाराम पठारे व वाहक लक्ष्मण केवटे यांना आदरांजली वाहण्यात आली. महाराष्ट्रात १९३२ मध्ये सार्वजनिक प्रवासी वाहतुकीची सुरुवात झाली असली तरी १ जून,१८४८ पासून खऱ्या अर्थाने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ “प्रवाशांच्या सेवेसाठी” हे ब्रीद घेऊन सेवा बजावत आहे. गाव तेथे रस्ता आणि रस्ता तेथे एसटी खेड्यापासून शहरापर्यंत सेवा देत आहे. संपूर्ण महाराष्ट्रभर जाळे पसरलेली एसटी ही सर्वसामान्यांच्या प्रवासाचे हक्काचे साधन बनले आहे. गेली ७५ वर्षे सर्वसामान्य जनतेची जीवनवाहिनी म्हणून एसटी आपली सेवा बजावत आहे. सुरक्षित प्रवासासाठी आणि एस.टी च्या संवर्धनासाठी एसटीचा वापर करणे हाच अमृत महोत्सवी वर्धापन दिनानिमित्त संकल्प केला पाहिजे असे ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष प्रा.श्री.एस.एन. पाटील यांनी सांगितले.
एसटी च्या माध्यमातून आम्ही चांगली सेवा देण्याचा प्रयत्न करीत आहोत आणि यापुढे असाच प्रयत्न राहील असे वैभववाडी बस स्थानकचे वाहतूक नियंत्रक श्री.बी.सी. गुरखे यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले.या वर्धापन दिनानिमित्त वाहतूक नियंत्रक श्री.बी.सी.गुरखे, वाहक एस.बी.पन्हाळकर, ए.ए.चिंदरकर चालक एम.व्ही. जाधव, के.के.यादव, एस. एस. रावराणे, पी.पी.नेवरेकर व सफाई कामगार गणेश कांबळे यांना गुलाब पुष्प देऊन स्वागत व शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी ग्राहक पंचायत महाराष्ट्र जिल्हा शाखा सिंधुदुर्गचे सचिव श्री.संदेश तुळसणकर, तालुका अध्यक्ष कुमार स्वामी, सचिव तेजस साळुंखे, उपाध्यक्ष इंद्रजित परबते, संघटक जयवंत पळसुले, सल्लागार शैलेंद्रकुमार परब व ॲड.प्रताप सुतार, सामाजिक कार्यकर्ते डी. के. सुतार, आर.बी.अडुळकर आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक शैलेंद्रकुमार परब यांनी केले तर आभार तालुका अध्यक्ष कुमार स्वामी यांनी व्यक्त केले.