जे जे रुग्णालय आणि आमचा संबंध संपला; डॉ. लहाने

ब्युरो न्युज (मुंबई) : जे. जे. रुग्णालयातील नेत्रशल्यचिकित्सा विभागातील वादात आज आणखी एक वळण आले. या विभागाच्या डॉक्टरांनी आज पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडली. आजपासून आमचा आणि जे. जे. रुग्णालयाचा संबंध संपला असल्याची उद्गिवन घोषणा विभागाचे मानद प्राध्यापक डॉ. तात्याराव लहाने यांनी केली. नेत्रशल्यचिकित्सा विभागातील आठ प्राध्यापक डॉक्टरांनी पत्रकार परिषदेला हजेरी लावली. एकतर्फी बाजू ऐकून घेत रुग्णालयच्या अधिष्ठात्यांकडून गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आमची चौकशी करा अशी मागणी करूनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले असल्याचा आरोप डॉ. लहाने यांनी केला.

मुंबई मराठी पत्रकार संघात झालेल्या आजच्या पत्रकार परिषदेत डॉ. तात्याराव लहाने, डॉ. प्रीतम सावंत, डॉ. शशी कपूर, डॉ. स्वरांजित सिंग, डॉ. सायली लहाने (तात्याराव लहाने यांची मुलगी), डॉ. दीपक भट (देशातील एकमेव डोळ्यांचे रेडिओलॉजिस्ट) डॉ. अश्विन बाफना यांनी पत्रकार परिषद घेतली. तर, नेत्रशल्यचिकित्सा विभागाच्या प्रमुख डॉ. रागिणी पारेख यांनी हजेरी लावली. मात्र, पत्रकार परिषदेत सहभाग घेतला नाही.

निवासी डॉक्टरांनी डॉ. लहाने आणि डॉ. पारेख यांच्यावर मनमानीपणा करत असल्याचा आरोप केला होता. एनएमसीच्या नियमांचे पालन होत नसल्याचा मार्डचा आरोप होता. यासाठी निवासी डॉक्टरांनी संप पुकारला आहे. मात्र, या दरम्यानची अत्यावश्यक सेवा सुरू ठेवली आहे. डॉ. लहाने यांनी आजच्या पत्रकार परिषदेत हे आरोप फेटाळून लावले आहेत. डॉ. सुमित लहाने हे एनएमसी गाईडलाईन्सनुसार येत होते आम्हीच त्यांना बोलवून रुग्णसेवेसाठी शस्त्रक्रिया करा अशी मागणी केली होती. मात्र अधिष्ठाता ह्या गुन्हा दाखल करण्यापर्यंत गेल्या आहेत. जर रुग्णसेवा देण्यासाठी जर तुरुंगात जावं लागलं तर जा असं डॉक्टर सुमित लहाने यांना सांगितले असल्याचे डॉ. तात्याराव लहाने यांनी सांगितले.

कनिष्ठ निवासी डॉक्टर-3 च्या विद्यार्थ्यांना आम्ही शस्त्रक्रिया शिकवली आहे. दरवर्षी आमच्या विभागाकडे 70 ते 80 हजार रुग्ण दरवर्षी आमच्याकडे येतात. जेजे रुग्णालयातील नेत्रशल्यचिकित्सा विभाग महाराष्ट्रातील सर्वात नावाजलेला विभाग आहे. आमची चौकशी करा अशी मागणी मागणी होती. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले असल्याचे डॉ. लहाने यांनी म्हटले.

त्यांनी पुढे म्हटले की, माझे आणि गिरीश महाजन यांचे कुठेही वाद नाही. रघुनाथ नेत्रालय सुरू केले आहे. त्यामुळे कोणत्याही रुग्णांना वाऱ्यावर सोडणार नाही. मी रुग्णालय सुरू करून एक वर्ष झालं आहे. आजही जे.जे. रुग्णालयात सकाळी सात वाजता ते 3.30 वाजेपर्यंत जेजे रुग्णालयात सेवा देतो असे, डॉ. लहाने यांनी सांगितले. अंबेजोगाईत मी चॅरिटी रुग्णालय काढलंय, तिथे मोफत सेवा देतो, डायलिसिसी देखील मोफत करत असल्याची माहिती त्यांनी दिली.

जेजे हॉस्पिटलमधली ही परिस्थिती, मार्डचे निवासी डॉक्टर विरुद्ध डॉ. तात्याराव लहाने, डॉ. तात्याराव लहाने विरुद्ध अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे यांच्या अंतर्गत वाद, संघर्षातून निर्माण झाली आहे. याचा फटका हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी येणाऱ्या आणि अॅडमिट झालेल्या रुग्णांना, त्यांच्या नातेवाईकांना बसत असल्याचे म्हटले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!