कुडाळ ( अमोल गोसावी ) : तेंडोली- रवळनाथ मंदिर -आदोसेवाडी -वेतोरे रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. या रस्त्यावर खड्डे पडल्यामुळे वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. रस्त्यावर आलेली खडी अपघातास कारणीभूत ठरत आहे. त्यामुळे या रस्त्यास कोणी वाली आहे का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. या रस्त्याची दुरुस्ती व्हावी, अशी मागणी तेथील ग्रामस्थ करीत आहेत.
तेंडोली-रवळनाथ मंदिर -आदोसेवाडी-वेतोरे रस्ता ७ किलोमीटर आहे. हा रस्ता १० वर्षापूर्वी जिल्हा परिषद निधीमधून झाला होता. सध्या या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. रस्त्यावरुन वाहनधारकांना जीव मुठीत धरुन प्रवास करावा लागत आहे. येथे पायी चालताना सुद्धा लोकांना त्रास होत आहे. या रस्त्यावरुन दिवस-रात्र मोठ्या प्रमाणात वाहनांची रहदारी सुरु असते. या भागात मोठ्या प्रमाणात लोकवस्ती आहे. तसेच काजू कारखाने, दुकाने, दवाखाने, मंदिरे आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात रस्त्याने वाहनांची ये-जा सुरु असते. या भागात प्राथमिक शाळा सुद्धा आहे. त्यामुळे या रस्त्याने सतत लहान मुलांची रहदारी सुरु असते. काजू कारखान्यात मोठ्या प्रमाणात मोठ्या अवजड वाहनांची रहदारी सुरु असते. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे. रस्त्या नजीक गटार नसल्यामुळे पावसाळ्यात या रस्त्यावरून पाणी जाऊन हा रस्ता अजून खराब होण्याची शक्यता आहे. कित्येक वेळा राजकीय नेत्यांचे या रस्त्याबाबत लक्ष वेधण्यात आले. परंतु, निवडणूकीपूर्ती तात्पुरती रस्त्याची आश्वासने देण्यात आली. त्यामुळे ग्रामस्थामध्ये तीव्र नाराजी आहे.











