नांदोस येथे मूळ गावी झाला सत्कार
मसुरे (प्रतिनिधी) : बॅ नाथ पै सेवांगण कट्टाच्या वतीने यूपीएससी परीक्षा गुणवंत तुषार पवार याचा त्याच्या मालवण तालुक्यातील नांदोस निवासस्थानी सत्कार करण्यात आला. यावेळी तुषार पवार म्हणाले, अविनाश धर्माधिकारी यांचे ओरोस येथे झालेले व्याख्यान ऐकून आपणही ही परीक्षा ध्यावी असा विचार मनात आला .५ वी शिष्यवृत्ती, ७ वी शिष्यवृत्ती, एनएम एमएस या परीक्षांचा आपणास खूपच फायदा झाला हेही त्याने आवर्जून सांगितले अन् स्पर्धा परीक्षेची ती पायरी आहे. सर्व मुलानी ती परीक्षा देणे आवश्यक आहे. असेही तो म्हणाला.
खाजगी क्लास काही महिने जॉईन केला अन् त्यानंतरच्या लॉकडाऊनमुळे सारा अभ्यास यू ट्यूब व पुस्तकाच्या माध्यमातून केला. रोज सात ते आठ तास अभ्यास करायचो. नंबर ८oo पेक्षा जास्त असून यापेक्षा जास्त गुणवत्ता मिळवून प्रशासकीय सेवेत यायचं आहे हे त्याने ठासून सांगितले. तो पुन्हा परीक्षेस बसला आहे. सार्या गप्पात त्याचा नम्र स्वभाव, स्वभावातील ऋजुता आम्हा सर्वाना प्रभावीत करून गेली असे दीपक भोगटे म्हणाले. अभिनंदन पत्रातील प्रा मधु दंडवते व बॅ नाथ पै यांचे नांव व फोटो पाहून तुषार खूप आनंदीत झाला अन् “या दोन महनीय आदरणीय व्यक्तींचा अभ्यास केल्याशिवाय सिंधुदुर्गचे खरी प्रतिमा दिसणार नाही अन अभ्यास पूर्ण होणार नाही. ते माझे आदर्श आहेत” असे तुषार म्हणाला. ऑक्टोबर मध्ये सेवांगण मालवण व सेवांगण कट्टा येथे विद्यार्थ्यासाठी पूर्ण दिवसाची कार्यशाळा घेण्याचा मनोदय त्याने व्यक्त केला आहे. यावेळी किशोर शिरोडकर, शाम पावसकर. दीपक भोगटे, वैष्णवी लाड, प्रशांत म्हाडगुत, सुजाता पावसकर, श्रीधर गोंधळी, तुषारचे आई- वडिल, आजी,आजोबा, अमित चव्हाण आदी उपस्थित होते.