कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर आक्षेपार्ह व्हाट्सअप स्टेटस टाकल्यामुळे कोल्हापुरातील वातावरण तणावपूर्ण बनले. संबंधित स्टेटसने शिवछत्रपतींची बदनामी करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला. अशी कृती पुरोगामी कोल्हापूर कदापि सहन करणार नाही. स्वराज्यावर चाल करून येणाऱ्या एका क्रूर शासकाचे उदात्तीकरण मान्य होणे नाही. असे कृत्य करणाऱ्यांचे आम्ही निषेध करतो. या प्रवृतीला लगाम घालून अशांवर कडक कारवाई झालीच पाहिजे.
या पार्श्वभूमीवर उसळलेल्या जनक्शोभाला हिंसक वळण लागले. पोलिसांनी वेळीस सतर्कता दाखवून परिस्थिती नियंत्रणात आणली. परंतु, काही समाजकंटाकांनी दगडफेक, तोडफोड करून परिसरातील घरे, दुकाने आणि गाड्यांचे नुकसान केले. या जमावाला भडकावून कोणी हिंसक बनवले, यामागे कोणाचा हात आहे याचा तपास झाला पाहिजे. अशा समाजकंटाकांना शोधून त्यांना कडक शासन झाले पाहिजे. समाजामध्ये तेढ निर्माण करणाऱ्यांची पोलीस यंत्रणेने अजिबात गय करू नये.
या दंगलीचे खरे सूत्रधार कोण याचा शोध पोलिसांनी घेतला पाहिजे. स्टेटसच्या मध्यमातून समाजात तेढ वाढावे यासाठी कोणती संघटना कार्यरत आहे याचा शोध घेऊन त्यांना वेळीस पायबंद घालावा.
पोलिसांनी शांतता दक्षता समिती, सलोखा समितीच्या माध्यमातून प्रत्येक भागात बैठका आयोजित कराव्यात. सर्व सामाजिक संघटना, तरुण मंडळे आदींनी पुढाकार घेऊन कोल्हापूरची शांतता अबाधित राहावी यासाठी शर्तीचे प्रयत्न करावेत असे आवाहन आम आदमी पार्टी करत आहे.