कल्याण येथील सार्वजनिक वाचनालयाने प्रजासत्ताक दिनी केला सन्मान
सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : १६० वर्षांहून अधिक काळ राज्यभरातील सर्वोत्तम दिवाळी अंकांना राज्यभरातील वाचकांपर्यंत घेऊन जाणाऱ्या सार्वजनिक वाचनालय कल्याण मुंबई यांच्यामार्फत आयोजित दिवाळी अंक स्पर्धेत आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूजच्या ‘अद्वैत” या दिवाळी अंकाने उत्तेजनार्थ पुरस्कार प्राप्त केला आहे. या स्पर्धेचे बक्षीस वितरण प्रजासत्ताक दिनी २६ जानेवारी, २०२३ रोजी सार्वजनिक वाचनालय कल्याण मुंबई येथे सभागृहात संपन्न झाले. यावेळी अद्वैत दिवाळी अंकाच्या वतीने संपादक सहाय्यक मिलिंद घायवट यांनी मान्यवरांच्या हस्ते परितोषिकाचा स्वीकार केला. यावेळी वाचनालयाचे अध्यक्ष मिलिंद कुलकर्णी, सरचिटणीस भिकू बारस्कर यांच्या उपस्थितीत वाहतूक विभाग कल्याणचे सहा. पोलीस आयुक्त मंदार धर्माधिकारी, लोकमत चे वरिष्ठ सहाय्यक संपादक संदीप प्रधान यांच्या हस्ते सन्मानचिन्ह, सन्मानपत्र आणि रोख रक्कम देऊन सन्मान करण्यात आला.
आजकालची मुलं या लक्षवेधी विषयाला अनुसरून आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज च्या वतीने अद्वैत दिवाळी अंक प्रकाशित करण्यात आला होता. ‘आजकालची मुलं’ म्हटल्यावर त्याकडे नकारात्मक दृष्टिकोनातून पाहिले जाते. मात्र आजकालची ही मुलं खूप वेगवेगळ्या क्षेत्रात आपला ठळक ठसा उमटवत आहेत. सामाजिक जडणघडणीत महत्त्वाची भूमिका निभावत आहेत. अशाच संविधानिक मूल्यांना आदर्श मानत कार्यरत असणाऱ्या महाराष्ट्रभरातील आजकालच्या २० युवक-युवतींवर या अंकाच्या माध्यमातून प्रकाश टाकण्यात आला आहे. यात मासिक पाळीसारख्या विषयात डॉक्टरेट मिळविणाऱ्या आणि याविषयावर समाज जागृती करणाऱ्या डोंबिवली येथील डॉ. प्रियांका कांबळे, संविधान संवादक ही संविधानिक चळवळ संपूर्ण महाराष्ट्रात पसरविणारे कोल्हापूर येथील संविधान संवादक, लेखक राजवैभव शोभा रामचंद्र, समाजातील असहाय्य माता-भगिनी आणि कोवळ्या जीवांना ‘अभेद्या फाउंडेशन’ च्या माध्यमातून हक्काचा विसावा मिळवून देणाऱ्या जळगावच्या वैशाली झालटे, आपल्या वकिली व्यवसायाचा समाजाच्या उन्नतीसाठी वापर करत ‘पाथ फाउंडेशन’च्या माध्यमातून रचनात्मक काम करणारे, देश-विदेशात सामाजिक प्रश्नांना वाचा फोडणारे गडचिरोली येथील ॲड. बोधी रामटेके, पर्यावरणीय प्रश्नांना वाचा फोडत निसर्ग शाबूत ठेवण्यासाठी त्याला शाश्वत पर्यटनाची जोड देणारे सिंधुदुर्ग येथील ‘कोकणी रानमाणूस’ प्रसाद गावडे, एच. आय. व्ही. हा आजार नसून जगण्याची संधी मानत एच. आय. व्ही. बाधितांचा जागतिक राजदूत बनून जगभर प्रवास करणारे अमित मोहिते, पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत ४३५ दिवस आणि १७००० किमी ची सायकल भ्रमंती करणारी यवतमाळ येथील प्रणाली चिकटे, शेतीमध्ये कल्पकता वापरून ‘शून्य मशागत शेती’ पद्धतीचा अभ्यास करून कमी कष्टात शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि समाधान आणणारा कर्जत येथील कृषी संशोधक अनिल निवळकर, समाजाच्या बुरसटलेल्या विचारसरणीचा ३३ वर्षे सामना करत देशातील पहिल्या तृतीयपंथी शासकीय शिक्षिका बनलेल्या रिया आळवेकर, भारतीय संगीत परंपरेतील महत्त्वाचे वाद्य असणारी सतार देशोदेशी पोहोचवत कला धर्माच्या दावणीला अडकलेली नाही हे दाखवून देणारा मिरज येथील अतिक सतारमेकर, सर्व धार्मिक बांधनाची चिकित्सा करत पत्रकारितेसारख्या धाडसी क्षेत्रात वावरणारी कोल्हापूर येथील मिनाज लाटकर, ४५ लाखांची ब्रिटिश सरकारची चेव्हनिंग शिष्यवृत्ती मिळवून लंडनला गेलेला वंचित समाजासाठी तळमळीने काम करणारा चंद्रपूर येथील ॲड. दीपक चटप, सह्याद्री संवर्धन आणि संशोधन संस्था या माध्यमातून पर्यावरण आणि ते राखणारे आदिवासी यांच्यासाठी धडपडणारी चिपळूण येथील सोनल प्रभुलकर, व्यसनाधीन आणि अनाथ माणसांसाठी कार्यरत असणारा मुंबई येथील रुपेश गीता रामचंद्र, भुकेल्या, अनाथ, वंचित परंतु स्वकर्तृत्वाने झेप घेऊ पाहणाऱ्या तरुणाईला ‘युवान’ च्या माध्यमातून बळ देणारे अहमदनगरचे संदीप कुसळकर, ‘टीम तरुणाई’च्या माध्यमातून विधायक, प्रयोगशील काम करणारा बुलढाणा येथील अभिषेक अनिता पुरुषोत्तम, ‘ओवी ट्रस्ट’ संचालित बालनागरीच्या माध्यमातून प्रवाहाबाहेरील मुलांसाठी शिक्षणाची दारं खुली करणारी प्रणाली सुहासिनी चंद्रकांत जाधव, अल्पावधीतच मालिका, सिनेमा क्षेत्रात आपले अस्तित्व निर्माण करणारा झी मराठीवरील ‘बाजींद’ या मालिकेचा संवाद लेखक सांगली येथील विक्रम शिरतोडे, दगडांतून विविध व्यक्तिचित्रे रेखाटून दगडांना जिवंत करणारे स्टोन आर्टिस्ट सुमन दाभोलकर, सामाजिक, कौटुंबिक संघर्षाचा सामना करत सामाजिक कार्यात कार्यरत असणारे मिलिंद घायवट यांच्या कार्याचा आढावा या अंकात घेण्यात आला आहे. त्यासोबतच सचिन पाटील आणि आनंदहरी यांच्या कथांसोबत अनेक मान्यवर आणि युवा कवींच्या कवितांचाही अंकात समावेश आहे. या अंकाचे मुख्य संपादक राजन चव्हाण हे असून कार्यकारी संपादक सरिता पवार या आहेत. संपादन सहाय्य मिलिंद घायवट आणि श्रेयश शिंदे यांनी केले असून विशेष सहाय्य आनंदहरी यांचे लाभले आहे.