शिवसेना उ.बा.ठा. च्या वतीने मुख्याधिकारी नगरपंचायत वाभवे वैभववाडी यांना निवेदन
वैभववाडी (प्रतिनिधी): गेल्या सहा वर्षामध्ये वैभववाडी नगरपंच्यायत अस्तित्वात आल्यापासून शहरातील नागरीकांच्या मुलभूत प्रश्नांकडे नगरपंचायत प्रशासन व पदाधिकारी यांचा दुर्लक्ष आहे. आज वैभववाडी शहरातील नागरीक हे पाण्यासाठी वणवण भटकत आहेत. ८०% शहरातील नागरीकांना पाणी हे शहराबाहेरून विकत आणावे लागते. कारण गेल्या सहा वर्षामध्ये नगरपंचायत अस्तित्वात येऊन सुध्दा या न.प. प्रशासनाने व लोकप्रतिनिधींनी शहरातील लोकांच्या पिण्याच्या पाण्यासाठी कुठलीही ठोस उपाययोजना केलली नाही. वैभववाडी शहराला दोन्ही बाजुने दोन नद्या आहेत. या ठिकाणी पाण्याचा मुबलक साठा आहे. परंतु पाण्यासारख्या गंभीर विषयाकडे प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष आहे. याउलट ज्या ठिकाणी गरज नाही, अशा ठिकाणी काहींच्या आर्थिक फायद्यासाठी हा निधी खर्च केला जात आहे. आज वैभववाडी शहरामध्ये टँकरने पाणी पुरवण्याची वेळ प्रशासनावर का आली? याचा विचार न.प. प्रशासनाने व लोकप्रतिनिधींनी करावा.. गेल्या दोन वर्षांपूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री श्री उध्दवजी ठाकरे व तत्कालीन पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील तसेच तत्कालीन पालकमंत्री श्री उदयजी सामंत यांनी वैभववाडी शहराच्या पाणीपुरवठा योजनेसाठी सुमारे ७.०० कोटी रु. निधी मंजूर केलेला होता. परंतु न.पं. प्रशासनाच्या व लोकप्रतिनिधींच्या उदासिनतेमुळे हा निधी खर्च होऊ शकलेला नाही. याला जबाबदार पूर्णपणे नगरपंचायत प्रशासन आहे. त्याचप्रमाणे आज वैभववाडी शहरामध्ये कासार वहाळ ते तहसिलदार ऑफिस ते महाराणाप्रताप व इतरत्र शहरातील स्ट्रीट लाईट सुध्दा ब-याचठिकाणी बंदावस्थेत आहेत. शहरातील गटारे सुध्दा सांडपाण्याने तुंबलेली आहेत. गटारामध्ये पूर्णपणे घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे. त्यामुळे शहरात दुर्गंधीचे प्रमाण वाढलेले असुन असून शहरात डासांची पैदास निर्माण होऊन डेंग्यु सारखे रोग निर्माण होण्याची देखील शक्यता आहे. त्यासाठी ही सर्व गटारे आपल्याकडून पूर्णपणे साफ करून स्वच्छ करावीत; जेणेकरून शहरातील नागरीकांना
व शहराबाहेरून येणा-या तालुक्यातील जनतेला त्याचा त्रास होऊ नये याची खबरदारी न. प. प्रशासनाने घेतली पाहीजे. नगरपंचायत असून सुध्दा शहरात फॉगिंग मशीनची देखील व्यवस्था नाही वा तीचा वापर केला जात नाही. त्याचप्रमाणे नगरपंचायत मध्ये कचरा कामगार असतानासुध्दा कच-याचा योग्य निपटारा होत नाही. ठिकठिकाणी कचरा व बाटल्यांचा खच पडलेला दिसतो. शहरामध्ये डॉक्टर मराठे यांचे दवाखाण्यासमोर गेली दोन वर्षे खोदाई करून ठेवलेली होती. त्यामुळे त्याठिकाणी पानी साचून पावसाळ्यामध्ये रोगजंतु निर्माण होऊ शकतात. अजुनही त्याठिकाणी तशीच परिस्थिती आहे. शहरामधील कचरा डेपोचे थाटामाटात उद्घाटन करून आज त्या कचराडेपोच्या जागेची काय परिस्थिती आहे? हा सर्व कचरा कचरा डेपो नसल्यामुळे शहरातील दुकानदार
व्यावसायीक यांना कुठेतरी बाहेर नेऊन टाकावा लागतो. त्याचप्रमाणे आपल्या कचरा गाडीतून जाणारा कचरा हा सांगुळवाडी रोड गांगोचा माळ येथे टाकला जातो. त्यामुळे येणा-या जाणा-या वाहनधारकांना दुर्गंधीला सामोरे जावे लागते. तरी नागरीकांच्या या सर्वच समस्यांकडे आपण नगरपंचायत प्रशासनाचे प्रमुख म्हणुन गांभिर्याने लक्ष देऊन या सर्व समस्या सोडविण्यासाठी लवकरात लवकर प्रयत्न करावेत. अन्यथा पावसाळ्यामध्ये जर येथील नागरीकांना त्रास व गैरसोय झाली तर नगरपंचायत प्रशासनावर शहरातील नागरीकांना घेऊन मोर्चा काढावा लागेल असा इशारा निवेदनाद्वारे शिवसेना उ.बा.ठा वैभववाडी च्या वतीने देण्यात आला आहे.