सिंधुदुर्ग जिल्हा पोलिसांची धाडसी कामगिरी
सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : फोंडा, भालेकरवाडी येथील जंगलात मिळुन आलेल्या मोटार सायकलच्या माध्यमातून कणकवलीत १९ डिसेंबर रोजी झालेल्या घरफोडीतील संशयिताच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले आहे. आटल्या ऊर्फ अतुल ईश्वर भोसले असे या सराईत गुन्हेगारास स्थानिक गुन्हे शाखेकडून अहील्यानगर जिल्ह्यातील कर्ज कोर्ट गेट जवळून अटक करण्यात आली आहे. त्याच्यावर खुन, सरकारी नोकरावर खुनी हल्ला, बलात्कार, दरोडा, जबरी चोरी, घरफोडी स्वरुपाचे ४७ गंभीर गुन्हे दाखल असून त्याचा शोध सुरु होता, अशी माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांनी दिली.
कणकवली पोलीस ठाण्यात १९ डिसेंबर २०२४ रोजी घरफोडी प्रकरणाचा गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यासाठी वापरलेली मोटार सायकल फोडा, भालेकरवाडी येथील जंगलात मिळुन आली होती. या मोटार सायकलच्या सुगाव्यावरुन संशयीत आरोपी आटल्या ऊर्फ अतुल ईश्वर भोसले, वय-27 रा. बेलगाव, ता. कर्जत, जि.अहिल्यानगर असल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानुसार आष्टी जि.बिड व अहिल्यानगर येथे शोध घेण्याकरीता सिंधुदुर्ग स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखा व कणकवली पोलीस ठाणे कडील संयुक्त पथक रवाना करण्यात आले होते. हा गुन्हा दाखल झाल्यानंतर नमुद गुन्हयाचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखा यांचेकडून सुरु होता. संशयित आरोपी आटल्या ऊर्फ अतुल ईश्वर भोसले यांची माहिती संकलित करुन त्याचे विश्लेषण करण्यात आले. त्यावरुन रेकॉर्ड वरील आरोपी आटल्या ऊर्फ अतुल ईश्वर भोसले रा. बेलगाव, ता. कर्जत, जि. अहिल्यानगर याचेवर संशय बळावला. त्याचे ठावठिकाणा विषयी माहिती घेता तो वारंवार आपले वास्तव्याची ठिकाणे बदलत होता.
गोपनिय बातमीदारांच्या मदतीने त्याचे ठाव ठिकाणाची माहिती प्राप्त करुन आरोपी याचा बीड व अहिल्यानगर जिल्हयात शोध घेत असताना संशयित आरोपी हा कर्जत कोर्टाचे गेट जवळ दिसुन आला. आरोपी सराईत गुन्हेगार असल्याने व पोलीसांची चाहुल लागताच पळुन जाणारा असल्याने सापळा रचुन शिताफीने त्यास पथकातील अधिकारी, अंमलदार यांनी ताब्यात घेऊन त्याचेकडे दाखल गुन्हयाचे संबंधाने प्राथामिक तपास केला असता, त्याने कणकवली येथील घरफोडी गुन्हयाची कबुली दिली. त्यानंतर गुन्हयाचा तपास सुरु असुन तपासामध्ये आटल्या ऊर्फ अतुल ईश्वर भोसले याने अन्य ठिकाणीही घरफोडी चोरीचे गुन्हे केलेबाबत कबुली दिलेली आहे. त्यानुसर कणकवली पोलीस ठाणे कडून तपास चालू आहे.