कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली येथील शिक्षण प्रसारक मंडळाच्या कणकवली महाविद्यालयातील राष्ट्रीय छात्र सेनेचा विद्यार्थी सार्जंट सार्थक संतोष ठूकरुल याची नवी दिल्ली येथे होणाऱ्या मुख्य प्रजासत्ताक दिनानिमित्त होणाऱ्या राष्ट्रीय पातळीवरील आरडीसी संचलनासाठी निवड झाली आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातून यावर्षी एनसीसी वरिष्ठ विभागातून कणकवली महाविद्यालयाचा एकमेव छात्र सार्थक ठुकरूल यास या वर्षी महाराष्ट्रातून हा मान मिळाला असून त्यास ५८ महाराष्ट्र बटालियनचे कमांडिंग ऑफिसर कर्नल दीपक दयाळ, प्रशासकीय अधिकारी कर्नल निलेश पाथरकर आणि कणकवली कॉलेज एनसीसी अधिकारी लेफ्ट. डॉ. बी. एल.राठोड, सिटीओ जयश्री कसालकर यांचे मार्गदर्शन मिळाले.
राष्ट्रीय पातळीवरील संचलनात सहभागी होण्याची संधी मिळाल्याबद्दल व कणकवली महाविद्यालयाच्या लौकिकात भर घातल्याबद्दल सार्थक ठुकरुल याचे शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष दत्तात्रेय तवटे,चेअरमन डॉ. राजश्री साळुंखे, सचिव विजयकुमार वळंजू,सर्व संस्था पदाधिकारी, प्राचार्य डॉ. आर. बी. चौगुले यांनी अभिनंदन केले आहे.