तळेरे (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा, तालुका कणकवली, कासार्डे गावातील “आनंदनगर” येथील रहिवासी तसेच कासार्डे विकास मंडळ मुंबईचे माजी अध्यक्ष परशुराम माईणकर, ( वय ८१ वर्षे ) यांचे बुधवारी दि.१८ डिसेंबर रोजी मुंबई येथे राहत्या घरी पहाटे निधन झाले. त्यांच्या निधनाची वार्ता समजताच कासार्डे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या विद्यालयाच्या वतीने भावपूर्ण श्रध्दांजली वाहण्यात आली आणि शालेय कामकाज बंद ठेवण्यात आले.
कासार्डे माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय ,कासार्डे आणि सिनियर कॉलेजच्या यशस्वी वाटचालीत माजी अध्यक्ष परशुराम माईणकर यांचे मोठे भरीव योगदान होते. कासार्डे विकास मंडळ मुंबई या संस्थेवर 14 वर्ष त्यांनी अध्यक्ष म्हणून काम पाहिले. याशिवाय देवनार मुन्सिपल वसाहत ई १० ब्लॉक कॉलनी वसाहत सोसायटीचे 25 वर्षापेक्षा अधिक काळ अध्यक्ष म्हणून सेवा बजावत होते.तसेच कुर्ला – पूर्व ते अनुशक्ती नगर विधानसभा क्षेत्र व वाशी शहर या विभागाचे “शिवसेना पक्षाचे ” ” माजी उप विभाग प्रमुख ” या पदा वर शिवसेना पक्ष स्थापने पासून अनेक वर्षे कार्यरत होते. स्थानिक श्रीगणेश उत्सव मंडळ कार्यकारणी कमिटीवर संचालक सदस्य, मुनिसिपल शॉपिंग सेंटरचे संचालक , दादर येथील द नॅशनल वैश्य क्रेडिट सोसायटी मध्ये १२ वर्षे अध्यक्ष व काही काळ संचालक व कमिटी सदस्य म्हणून त्यांनी काम पाहिले होते. या शिवाय मुळ गावी कासार्डे येथील जांभुळवाडीच्या तरुण उत्कर्ष मंडळाचे अध्यक्ष तसेच श्रीम्हाडकादेवी मंदिर कमिटीवर कार्यरत होते.
कै.परशुराम माईणकर हे बीएमसी कॉर्पोरेशनच्या के.एम.ई हॉस्पिटल मध्ये 40 वर्षे मेडिकल रेकॉर्ड ऑफिसर या क्लास वन पदावरून ते निवृत्त झाले होते.
त्यांच्या पश्चात पत्नी ,दोन विवाहित मुलगे ,दोन विवाहित मुली,सुना,जावई असा परिवार आहे.












