कुडाळ (प्रतिनिधी) : तेर्सेबांबर्डे मळावाडी ते मांडकुली भोईवाडी दरम्यान कर्ली नदीवर बहुप्रतिक्षित नाबार्ड अंतर्गत मोठ्या ब्रिजचे काम पूर्णत्वाकडे वाटचाल करत असतानाच या ब्रिज ला लागून असलेल्या व राष्ट्रीय महामार्ग क्र.66 च्या हाकेच्या अंतरावर असणाऱ्या सखल भागात जोड रस्त्यासाठी टाकलेला भराव व मोरीचे पाईप वाहून गेल्यामुळे येथील स्थनिक शेतकरी व जमीनदार व या मार्गावरून ये-जा करणारे ग्रामस्थ तीव्र शब्दात नाराजी व्यक्त करत आहेत. वास्तविक तेथील सखल भागाचा विचार करता सिमेंट पाईप टाकून त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाण्याला अडथळा निर्माण होऊ शकतो याचा पूर्वीच विचार केला गेला पाहिजे होता पण तसा विचार कुठेही केला गेला नाही . त्यामुळे 20 जुलै 2023 ला आलेल्या पूरपरिस्थिती मध्ये सार्वजनिक बांधकाम विभाग व ठेकेदार यांचे सर्व दावे फोल ठरलेले आहेत. या बाबत ग्रामस्थांनच्या वतीने प्रसाद धोंड व परशुराम नार्वेकर यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग सावंतवाडीचे कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड यांना निवेदन दिले .
पंचक्रोशीतील लोकांसाठी पूरपरिस्थितीत तेरसेबांबर्डे येथील ब्रिजला लागून असलेल्या सखल भागात किमान 20 मीटर लांब व 10 ते12 फूट उंच असणारा बॉक्सवेल बांधणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे आणि असे झाले तर पावशी, साई मंदिर पिंगुळी येथे तसेच साळगाव पायरोबा मंदिर येथील कॉजवे वर पाणी असताना पण पंचक्रोशीतील ग्रामस्थ तेर्सेबांबर्डे येथील ब्रिज वरून विनाअडथळा दळणवळण करू शकतील आणि असं झालं तर हा ब्रिज खऱ्या अर्थाने पूरपरिस्थितीत संकटकालीन मार्ग ठरेल . त्यामुळे सदर बॉक्सवेल मंजूर होणे अत्यंत आवश्यक आहे असे प्रसाद धोंड व परशुराम नार्वेकर यांनी निवेदनात म्हटले आहे. या बाबत कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड व कुडाळ सार्वजनिक बांधकाम विभागच्या गोवेकर यांनी सदर बाब विचाराधीन असल्याचे सांगितले.














