श्रीमंत छत्रपती शाहू महाराज ; ज्येष्ठ छायाचित्रकार राजा उपळेकर यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान
कोल्हापूर (प्रतिनिधी) : “छायाचित्रण ही एक अशी कला आहे ज्याला भाषा, जात आणि धर्म नाही. या क्षेत्रात प्रत्येकजण एका ध्येयाने काम करत असतो. म्हणूनच लोकशाहीचा चौथा स्तंभ असणाऱ्या पत्रकारितेत छायाचित्रकारांची जबाबदारीही आता वाढली आहे. त्यामुळे लोकशाहीत छायाचित्रकारांची भूमिका निश्चितच महत्वाची ठरणार आहे.’’ असे मत श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांनी व्यक्त केले. कोल्हापूर प्रेस क्लब व प्रेस फोटोग्राफर्स असोसिएशनतर्फे छायाचित्रकार दिनानिमित्ताने ‘अवतीभवती’ हे छायाचित्र प्रदर्शन व ज्येष्ठ वृत्तपत्र छायाचित्रकार जॉनी ट्रेनर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ जीवनगौरव पुरस्कार सोहळा झाला. यावेळी ते बोलत होते.
राजर्षी शाहू स्मारक भवनमध्ये झालेल्या सोहळ्यात माजी मंत्री व आमदार सतेज पाटील व श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या हस्ते ज्येष्ठ वृत्तपत्र छायाचित्रकार जॉनी ट्रेनर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ ज्येष्ठ छायाचित्रकार राजा उपळेकर यांना जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात आले. मानपत्र, सन्मानचिन्ह, रोख पाच हजार रूपये असे या पुरस्काराचे स्वरूप होते. आमदार पाटील म्हणाले, ‘‘स्वच्छ हृदय आणि डोळ्यातल्या सौंदर्याच्या जोरावर निर्मितीक्षमतेच्या कसोटीवर आजवर छायाचित्रकारांनी आंदोलनांसह जिल्ह्याची सौंदर्य स्थळांचे असंख्य क्षण कॅमेऱ्याच्या चौकटीत बंदिस्त केले. त्यांच्या निर्मितीक्षमतेला मोल नाही. हे मोल लोकांपर्यंत पोचवण्यासाठी प्रदर्शने, पुरस्कार सोहळ्यांची गरज आहे.’’ प्रेस क्लबचे अध्यक्ष शीतल धनवडे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.संचालक आदित्य वेंल्हाळ यांनी छायाचित्रकारांना येणाऱ्या अडचणींचा आढावा घेतला.सत्कारमूर्ती राजा उपळेकर यांनी मनोगत व्यक्त केले.अशोक रोकडे, शशिकांत कदम,नंदकुमार मोरे,राजू मेवेकरी, जयेश ओसवाल,अमर समर्थ यांचे सत्कार झाले.छायाचित्रकार बी.डी.चेचर यांनी मानपत्राचे वाचन केले.सुत्रसंचालन पत्रकार समीर देशपांडे यांनी केले.राहूल गायकवाड यांनी आभार मानले.यावेळी प्रेस क्लबचे उपाध्यक्ष प्रशात आयरेकर,कार्याध्यक्ष दिलीप भिसे,सचिव बाबुराव रानगे,संचालक समीर मुजावर,सचिन सावंत,मिथुन राजाध्यक्ष,भरत चव्हाण,ज्येष्ठ पत्रकार वासुदेव कुलकर्णी,उदय कुलकर्णी यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
या प्रदर्शनात ज्येष्ठ व नव्या छायाचित्रकारांनी टिपलेल्या सुंदर क्षणांचा एक अनोखा कोलाज मांडण्यात आला आहे. हे प्रदर्शन शनिवार (ता. 26) पर्यंत सकाळी 10 ते रात्री 8 वाजेपर्यंत खुले राहणार आहे. या प्रदर्शनाला भेट देण्याचे आवाहन प्रेस क्लबतर्फे केले आहे. या कार्यक्रमानंतर नवोदित छायाचित्रकारांसाठी विविध क्षेत्रातील छायाचित्र कसे काढावे, यासंबधी मार्गदर्शन कार्यशाळा झाली. यामध्ये ज्येष्ठ छायाचित्रकार रघु जाधव, प्रॉडक्ट व इंडस्ट्रीयल छायाचित्रकार संजय चौगले, वेडिंग छायाचित्रकार ऋषिकेश भांबुरे व सिनेमॅटिक छायाचित्रकार शुभम चेचर यांनी मार्गदर्शन केले.हा कार्यक्रम दरवर्षी घेतला जावा. जीवनगौरव परस्कारही दरवर्षी दिला जावा. जुन्या चांगल्या बातम्या आणि फोटो जतन करुन ठेवावेत. यासाठी निगेटीव्ह स्कॅनर घेण्यासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन यावेळी आम. बंटी पाटील यांनी दिले. तर जयेश ओसवाल यांनी जीवनगौरव पुरस्कारासाठी 10 हजाराची रक्कम देण्याची घोषणा यावेळी करण्यात आली.













