कुडाळ (अमोल गोसावी) : आंतर महाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेत अत्यंत मानाची समजली जाणारी महाराष्ट्र कलोपासक, पुणे आयोजित पुरुषोत्तम करंडक एकांकिका स्पर्धा यावर्षी कुडाळ येथे होणार आहे. या स्पर्धेचे उद्घाटन उद्या ठीक सकाळी ठीक ९ वाजता कुडाळच्या संत राऊळ महाराज कॉलेजमध्ये सुप्रसिध्द अभिनेत्री वर्षा वैद्य यांच्या हस्ते होणार आहे. स्पर्धा सिंधुदुर्गात होऊन सुद्धा जिल्ह्यातील महाविद्यालयांनी मनाच्या अशा या स्पर्धत सहभागी होण्यात मात्र रस दाखवलेला नाही. पुरुषोत्तम करंडक स्पर्धेच्या रत्नागिरी केंद्रावरील प्राथमिक फेरी दरवर्षी रत्नागिरी येथे होते. या केंद्रावर रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महाविद्यालयांचा समावेश असतो. या वर्षी ही फेरी दोन टप्प्यात होणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महाविद्यालयांसाठी कुडाळ येथे शुक्रवार दि. १ सप्टेंबर रोजी तर रत्नागिरी जिल्ह्यातील महाविद्यालयांसाठी शनिवार दि. २ सप्टेंबर रोजी चिपळूण येथे ही स्पर्धा होणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तीन व रत्नागिरी जिल्ह्यातील आठ अशी एकूण ११ महाविद्यालये या स्पर्धेत सहभागी झाली आहेत. या अकरा महाविद्यालयातुन प्रथम, द्वितीय, तृतीय व सर्वोत्कृष्ट प्रायोगिक एकांकिका अशा चार एकांकिका पुणे येथील महाअंतिम फेरीसाठी निवडल्या जातील. कुडाळ येथील संत राऊळ महाराज महाविद्यालयाच्या एकनाथ ठाकूर सभागृहात तर चिपळूण येथील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रात ही स्पर्धा संपन्न होईल.
कुडाळ मध्ये उद्या ‘पुरूषोत्तम’ ची प्राथमिक फेरी











