अखिल भारतीय मराठा महासंघ सिंधुदुर्ग च्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर “जबाब दो “आंदोलन

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी): मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी जालना येथे सुरू असलेल्या मराठा क्रांती आंदोलनात पोलिसांकडून झालेल्या लाटीचार्जमुळे मराठा आंदोलकांचे रक्त सांडले आहे.या सांडलेल्या रक्ताचा हिशोब शासनाला द्यावाच लागेल. मराठा बांधवांवरील हल्ल्याचा निषेध करण्यासाठी आणि जाब विचारण्यासाठी अखिल भारतीय मराठा महासंघ सिंधुदुर्ग च्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर “जबाब दो “आंदोलन करण्यात आले.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी गेली अनेक वर्ष मराठा समाज मागणी करत आहे. त्यासाठी लाखोंच्या संख्येने मूक मोर्चा काढून शासनाचे लक्ष वेधण्यात आले. त्यानंतर अनेक पत्रव्यवहार करूनही अद्याप मराठा समाजाला न्याय मिळालेला नाही. यासाठी जालना जिल्ह्यात मराठा समाजाच्या वतीने आंदोलन सुरू आहे. हे आंदोलन चिरडण्यासाठी शासनाने पोलिसांकरवी मराठा आंदोलनकर्त्यांवर लाटी हल्ला केला. या हल्ल्यात अनेक मराठा बांधव जबर जखमी झाले आहेत. याचा जाब विचारण्यासाठी आणि पोलिसांच्या कृतीचा निषेध व्यक्त करण्यासाठी आज सिंधुदुर्ग जिल्हा अखिल भारतीय मराठा महासंघाचे अध्यक्ष सुहास सावंत यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर “जबाब दो “आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात आमदार वैभव नाईक, विकास सावंत ,अना भोगले ,सिताराम गावडे, जान्हवी सावंत, यांच्यासह मोठ्या संख्येने मराठा बांधव सहभागी झाले होते. यावेळी बोलताना आमदार वैभव नाईक म्हणाले आरक्षण हा मराठ्यांचा हक्क आहे. त्यासाठी राजकारण बाजूला ठेवून मराठी बांधवांनी एकत्र या मराठा बांधवांवर होणारे हल्ले रोखण्यासाठी आता मराठ्यांना आपली ताकद दाखविण्याची वेळ आली आहे. त्यासाठी भविष्यात तीव्र आंदोलन करण्याची तयारी ठेवा. यावेळी आंदोलनाला संबोधित करताना अखिल भारतीय मराठा महासंघाचे अध्यक्ष एडवोकेट सुहास सावंत म्हणाले जालना येथे शांततेत सुरू असलेल्या आंदोलनातील मराठी बांधवांवर झालेला हल्ला निर्दयी आहे. शासनाने मराठ्यांचे आंदोलन चिरडण्यासाठी पोलीस बळाचा वापर करून मोठी चूक केली आहे. आंदोलनकर्त्या मराठा बांधवांच्या सांडलेल्या प्रत्येक रक्ताच्या थेंबाचा शासनाला हिसाब द्यावाच लागेल. शासनाने मराठा समाजाला गृहीत धरू नये. आतापर्यंत शांततेच्या मार्गाने आंदोलन करून मराठा समाजाने राज्यात आदर्श निर्माण केला आहे. त्याला तडा जाऊ नये ही शासनाची आणि प्रशासनाची जबाबदारी आहे. आरक्षण हा मराठ्यांचा हक्क आहे. आणि तो मिळालाच पाहिजे, तो शांततेच्या मार्गाने मिळणार नसेल तर यापुढे तीव्र आंदोलन करण्याची तयारीही आमची आहे. त्यासाठी मराठा बांधवांनी सज्ज रहा. आता नाही तर कधीच नाही हे लक्षात घेऊन प्रत्येक मराठी बांधवांनी आणि राजकर्त्यांनी राजकारण बाजूला ठेवून एकत्र या जिल्हा प्रशासनात मराठा समाजा बाबत द्वेष असणारे अधिकारी कार्यरत आहेत. त्यामुळेच नोकर भरती तसेच शिष्यवृत्ती याचा लाभ मराठ्यांना मिळत नाही आणि तो मिळविण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे मोठ्या संख्येने लढा दिला पाहिजे. मागील आंदोलनावेळी मराठा बांधवांवर टाकण्यात आलेले गुन्हे मागे घ्या. मराठा समाजाला आरक्षण दया. ही आमची मागणी आहे. ती जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत आमचा लढा सुरूच राहील. असा इशारा यावेळी सुहास सावंत यांनी दिला तर जालना येथे मराठा आंदोलकांवर झालेल्या लाटी हल्ल्याचा जाब विचारण्यासाठी हे “जबाब दो” आंदोलन केले आहे, त्याची दखल शासनाने वेळीच घ्यावी अन्यथा गणेश चतुर्थी नंतर संपूर्ण राज्यभर तीव्र आंदोलन केले जाईल असे स्पष्ट केले.आपल्या मागण्यांचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे यांच्याकडे सादर करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!