११ सप्टेंबर रोजी ओसरगाव येथील महामार्ग प्राधिकरण कार्यालयासमोर मनसेतर्फे आंदोलन छेडण्यात येणार

आवश्यक सुविधा पुरवण्याकडे महामार्ग ठेकेदाराकडून दुर्लक्ष – परशुराम उपरकर

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी): मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम सिंधुदुर्ग जिल्ह्यात पूर्ण झाले असले तरी अद्यापही या मार्गावर अनेक त्रुटी राहिल्या आहेत. आवश्यक सुविधा पुरवण्याकडे महामार्ग ठेकेदाराकडून दुर्लक्ष होत आहे. याबाबत जाब विचारण्यासाठी ११ सप्टेंबर रोजी ओसरगाव येथील महामार्ग प्राधिकरण कार्यालयासमोर मनसेतर्फे आंदोलन छेडण्यात येणार असल्याची माहिती मनसेचे राज्य सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. मात्र अद्यापही त्यामध्ये अनेक त्रुटी राहिल्या आहेत. वेग मर्यादा निश्चित करणारे फलक, रिप्लेक्टर, हेल्पलाइन फलक, लावण्यात आलेले नाहीत. महामार्गाचे काम पूर्ण झाल्यानंतर मागील तीन वर्षे संबंधित ठेकेदार मेंटनससाठी चे पैसे घेत आहे. एकूण रकमेच्या ४० टक्के रक्कम त्याला मिळाली आहे. तर उर्वरित ६० टक्के रक्कम पुढील पंधरा वर्षात ठेकेदाराला देणे अपेक्षित आहे. असे असताना संबंधित ठेकेदाराकडून मात्र आवश्यक सुविधा पुरविण्याकडे दुर्लक्ष केला जात आहे. या महामार्गावरून वाहन चालविण्याची प्रति तास वेग मर्यादा ८० किलोमीटर एवढी आहे. मात्र सध्या रस्त्याचे काम पूर्ण झाल्याने गणपती उत्सवासाठी मुंबईसह जिल्हा बाहेरून येणारे वाहन चालक वेग मर्यादेचे फलक नसल्याने अति वेगात वाहन चालवणार आहेत. अशा वेळी वेग मर्यादा ओलांडली म्हणून त्याना नाहक १००० ते २००० पर्यंत दंड भरावा लागणार आहे. महामार्गावर वेग-मर्यादाचे फलक नसल्याने वाहन चालकाना नाहक दंड भरावा लागणार आहे. यासाठी तात्काळ स्पीड ( वेग) मर्यादा दर्शविणारे फलक लावण्याची गरज आहे. तसेच महामार्गावर अपघात घडल्यास ॲम्बुलन्स व क्रेन उपलब्ध करून देणे ही ठेकेदाराची जबाबदारी आहे. मात्र अद्याप ही सुविधा दिली जात नाही. शिवाय यासाठी ठळकपणे हेल्पलाइनचे फलक लावण्यात आलेले नाहीत, ते तात्काळ लावण्यात यावेत. जिल्ह्यात ठीक ठिकाणी महामार्गाच्या बांधकामाची तोडफोड करून मिडलकट निर्माण करण्यात आले आहेत. अशा व्यक्तींचा शोध घेऊन कायदेशीर रित्या गुन्हे दाखल करणे ही ठेकेदाराची जबाबदारी आहे. मात्र तसे अद्याप गुन्हे दाखल करण्यात आलेले नाहीत. यामुळे अनेक अपघात होत आहेत आणि त्यामध्ये अनेकांचा बळी तसेच कायमस्वरूपी जायबंद व्हावे लागत आहे. शहरी भागात सर्विस रोड ,फूटपाथ ,ड्रेनेज पाईप इत्यादी सुविधांबाबत दुर्लक्ष झालेला दिसून येत आहे. अशाप्रकारे महामार्गाचे काम पूर्ण होऊनही जिल्हा वाशियाना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. याबाबत आवाज उठवण्यासाठी ११ सप्टेंबर रोजी ओसरगाव येथील महामार्ग प्राधिकरण कार्यालयासमोर मनसेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येणार आहे. याबाबतचे निवेदन आज जिल्हा पोलीस अधीक्षक तसेच उपविभागीय परिवहन अधिकारी यांना सादर करण्यात आले आहे. अशी माहिती मनसेचे राज्य सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी दिली. यावेळी कुडाळ माजी तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे, विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष आशिष सुभेदार, विनोद सांडव, अमोल जंगले, प्रतीक कुबल ,राजेश टंगसाळी ,आप्पा मांजरेकर ,मंदार नाईक, संदीप लाड ,वैभव धुरी, नंदू परब, निलेश देसाई, विजय जांभळे ,कुणाल चोडणेकर ,आदी मनसे पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!