सभेवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय
कुडाळ (अमोल गोसावी) : देशातील उद्योजक, व्यापाऱ्यांची शिखर संस्था समजली जाणारी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अँड एग्रीकल्चर ही वार्षिक सभा दिनांक 22 सप्टेंबर 2023 रोजी मुंबई येथे आयोजित करण्यात आलेली आहे. सभेचे आयोजन चतुर्थीच्या चौथ्या दिवशी करण्यात आलेले आहे, ज्या दिवशी गौरी आगमन सुध्दा आहे. या आयोजनाबाबत संपूर्ण व्यापारी, उद्योजक सभासदांमधून नाराजी व्यक्त होत आहे. त्या संदर्भात चेंबरचे अध्यक्ष श्री ललित गांधी यांना ई-मेल द्वारे सभेची तारीख बदलण्याची विनंती सुद्धा करण्यात आली परंतु अद्याप पर्यंत कोणत्याही प्रकारची कार्यवाही न करता केवळ मनमानीपणे संस्थेची वार्षिक बैठक ठरवलेली आहे. चेंबरच्या सर्वसामान्य सभासदांना चेंबरचं काम जवळून बघण्याची आणि विचार मांडण्याची संधी या वार्षिक सभेच्या माध्यमातून मिळत असते, परंतु संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या श्री गणेश चतुर्थीच्या आणि गौरी उत्सवाच्या दिवशीच मीटिंगचे आयोजन केल्यामुळे कोणत्याही सभासदाला सभेला उपस्थित राहणे कठीण होणार आहे.
त्याप्रमाणे चेंबरचे सभासद हे जास्तीत जास्त व्यावसायिक असतात, गणेश चतुर्थीच्या निमित्ताने व्यापार-उदीम चालू असताना व्यापाऱ्यांनी व्यवसाय करायचा ? की, सभा करायची ? हा प्रश्न विचारला जातोय. आज संपूर्ण महाराष्ट्रात जवळपास 4000 सभासद असणारी ही संस्था ज्यामध्ये सुमारे 350 ते 400 सभासद कोकण विभागातील आहेत तर मुंबईतील किमान 1000 पेक्षा जास्त सभासद आहेत, जे चतुर्थीच्या सणानिमित्त आपापल्या गावी गेलेले आहेत, त्यांच्या अनुपस्थितीत सभेच्या आयोजनाचा अट्टाहास कशासाठी हा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.
या सर्व सभासदांच्या नाराजीच्या अनुषंगाने आज कोकण विभागाच्या माध्यमातून सर्व सभासदांच्यावतीने जाहीर निषेध करत सभेवर बहिष्कार टाकण्याचे ठरविण्यात आले, तसेच कोकणातील सर्व सभासदांच्या माध्यमातून वार्षिक सभेस वंचित राहावे लागल्याबद्दल माननीय धर्मादाय आयुक्तांना निवेदन देण्याचे ठरविण्यात आले आहे. यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 25 सभासदांसह चंद्रशेखर पुनाळेकर, अशोक सारंग, भालचंद्र राऊत, महेश मांजरेकर, मनोज वालावलकर, जीएसटी असोसिएशनच्या अध्यक्षा सौ. जयंती कुलकर्णी, ऑल इंडिया मोटर ट्रान्स्पोर्ट काँग्रेस नवी दिल्लीचे संचालक शिवाजीराव घोगळे, मेघा सावंत, सागर तेली, राजा गावकर, विनायक निवेकर, रामचंद्र घोगळे, प्रमोद गावडे, अमरसेन सावंत, भास्कर परब, जितेंद्र पंडित, आनंद कर्पे, भालचंद्र सामंत उपस्थित होते.