खारेपाटण (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील खारेपाटण गावातील सर्वात जुनी असलेली बँक ऑफ महाराष्ट्र या शाखेमध्ये गेले ४ महिने प्रिंटर नसल्याने ग्राहकांना नाहक त्रास सहन करावा लागत असून नागरिकांना तथा ग्राहकाना आपल्या बँक पास बुक वरील डिटेल एन्ट्री मिळत नसल्यामुळे बँक व्यवस्थापना बद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
याबाबत अधिक वृत्त असे की,खारेपाटण शिवाजी पेठ येथे मध्यवर्ती भागात असलेली खारेपाटण शहरातील सर्वात पहिली व जुनी बँक म्हणून ओळख असलेल्या बँक ऑफ महाराष्ट्र शाखेत गेल्या ४ महिन्यापासून येथील प्रिंटर बंद असल्याने ग्राहकांना त्यांच्या बँक पासबुक वर व्यवहराच्या डिटेल इंट्री बघायला मिळत नाही. दुर्देवाने बँकेतील प्रिंटर मशीन ही बराच काळ बंद असल्याने ग्राहकांना त्यांच्या बँक पासबुकवर लिपिककडून पेनाद्वारे जमा रक्कम व शिल्लक रक्कम हाताने लिहून दिली जाते. मात्र प्रिटर मशीन नवीन घेण्याबाबत किंवा बसविण्याबाबत मात्र बँक व्यवस्थापन निरुस्ताही असल्याचे दिसते.
याबाबत बँकेच्या शाखा व्यवस्थापन यांच्याशी सम्पर्क साधला असता लवकरच नवीन प्रिटर मशीन बसविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान खारेपाटण येथील बँक ग्राहक येथून १४ किलोमिटर दूर असलेल्या तरेळे येथील बँक ऑफ महाराष्ट्र शाखेत जाऊन आपल्या बँक पासबुकवर जमा रकमेची एंट्री मारून आणत आहेत. यामुळे नागरिकांना नाहक आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. तर खारेपाटण येथील बँक ऑफ महाराष्ट्र शाखेत मोठ्या प्रमाणात मुंबई महानगर पालिकेतील सेवा निवृत्त झालेले कर्मचारी पेन्शन घेत असून या बहुतेक पेंशनर ग्राहक हे अशिक्षित असून त्यांना आपल्या बँकेतील पासबुकवरील डिटेल व्यवहारात समजण्या बाबत अडचण निर्माण होत आहे. खारेपाटणसह आजूबाजूच्या सुमारे ४० ते ५० गावातील नागरिक तथा ग्राहक हे या बँकेत सभासद असून लोकांची बँकेबद्दल आपली बँक मराठी माणसाची बँक म्हणून अजूनही विश्वसहर्ता टिकून आहे. ही आपुलकी बँक व्यवस्थापनाने जपणे काळाची गरज आहे. व नागरिकांची होणारी गैरसोय दूर करणे गरजेचे आहे.