अतिरिक्त सरकारी अभियोक्ता गजानन तोडकरी यांचा यशस्वी युक्तिवाद
सिंधुदुर्ग (राजन चव्हाण) : मासे उधार देत नाही या रागाने मासेविक्रेत्या महिलेच्या झोपडीला आग लावून नुकसान केल्याच्या गुन्ह्यात आरोपी संतोष रविंद्र बोडेकर उर्फ श्रीराम पालयेकर ( रा. घाटवाडी ,दोडामार्ग ) याला जिल्हा न्यायालयाने ३ वर्षे सश्रम कारावास आणि रोख १५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. संतोष बोडेकर याने फिर्यादी मच्छीविक्रेती महिला दर्शना दशरथ जाधव हिच्या दोडामार्ग येथील मासे ठेवलेल्या झोपडीस १९ मार्च २०२३ रोजी आग लावली होती. ही आग विझविण्यासाठी गेलेल्या संतोष बाबाजी राणे व अन्य जणांना आग विझवलात तर तुम्हालाही जाळून टाकीन अशी धमकी देत संतोष राणे यांच्या हॉटेलवर दगड मारला होता. दर्शना यांच्या फिर्यादीनुसार आरोपी संतोष बोडेकर विरोधात दोडामार्ग पोलिस ठाण्यात आयपीसी कलम ४३६,३३६,४२७,५०४,५०६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.आरोपी संतोष बोडेकर याला फिर्यादी दर्शना ह्या उधार मासे देत नसल्याचा राग होता. याच रागातून त्याने यापूर्वीही ६ मार्च २०२३ रोजी सुद्धा झोपडीला आग लावली होती. जिल्हा न्यायालयात झालेल्या या केस च्या सुनावणीत अतिरिक्त सरकारी अभियोक्ता गजानन तोडकरी यांनी आरोपी संतोष बोडेकर याने फिर्यादी दर्शना यांच्या झोपडीस आग लावून केलेल्या नुकसानी बाबत यशस्वी युक्तिवाद करून आरोपीचा गुन्हा सिद्ध केला. या खटल्यात जिल्हा न्यायाधीशांनी आरोपी संतोष बोडेकर याला आयपीसी कलम ४३६ नुसार ३ वर्षे सश्रम कारावास आणि १५ हजार रुपये दंड आणि आयपीसी कलम ३३६ नुसार ३ महिने साधा कारावास अशी शिक्षा ठोठावली. या गुन्ह्यात फिर्यादी दर्शना जाधव, पंच संतोष बाबाजी राणे, संजय वासुदेव शिरोडकर यांची साक्ष महत्वाची ठरली. गुन्ह्याचा तपास जयेश पांडुरंग ठाकूर यांनी केला होता. पैरवी म्हणून एस जे पाटील होते.












