त्रिंबक हायस्कूलचे २ संघ करणार जिल्ह्याचे नेतृत्व
आचरा (प्रतिनिधी): माध्यमिक शिक्षण समिती त्रिंबक संचलित जनता विद्या मंदीर त्रिंबक हायस्कूलच्या भव्य क्रीडांगणावर १० ऑक्टोबर २०२३ रोजी कोल्हापूर विभागीय शालेय शुटिंगबॉल स्पर्धेचा थरार रंगणार आहे. या स्पर्धेमध्ये कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्यांतील प्रथम क्रमांक प्राप्त एकुण ३२ संघ सहभागी होणार आहेत. या स्पर्धेच्या निमित्ताने क्रीडा रसिकांना राष्ट्रीय व राज्यस्तरीय खेळाडूंचा खेळ पाहण्याची सुवर्ण संधी मिळणार आहे. विशेष म्हणजे १७ व १९ वर्षे वयोगटातील प्रथम क्रमांक प्राप्त जिल्ह्यातील ४ संघांपैकी २ संघ हे जनता विद्या मंदीर त्रिंबक हायस्कूलचेच आहेत. मागील वर्षी सुद्धा जनता विद्या मंदीर त्रिंबक हायस्कूच्या मुलांच्या शुटींग बॉल संघाने कोल्हापूर विभागात दुसरा क्रमांक प्राप्त केला होता. या स्पर्धेच्या निमित्ताने जनता विद्या मंदीर त्रिंबक हायस्कूलला राज्यस्तरावर आपली वेगळी ओळख निर्माण करण्याची पुन्हा एकदा सुवर्ण संधी प्राप्त झालेली आहे. पंचक्रोशीतील क्रीडारसिकांनी सामने पहायला उपस्थित राहावे जेणेकरुन खेळाडूंमध्ये नवचैतन्य व उत्साह, वाढेल तसेच प्रोत्साहन द्यावे असे आवाहन माध्यमिक शिक्षण समिती त्रिंबक अध्यक्ष सुरेंद्र(अन्ना) सकपाळ, मुख्याध्यापक प्रविण बाबू घाडीगावकर यांनी केले आहे.
स्पर्धेसाठी शुभेच्छा.