ओरोस (प्रतिनिधी): कसाल वझरेवाडी येथे राहणाऱ्या लक्ष्मी नारायण गावडे (वय ८१) यांचे त्यांच्या राहत्या घरी मंगळवारी पहाटे दोन वाजता निधन झाले. त्या पत्रकार रवी गावडे यांच्या मातोश्री होत्या. तर कसाल ज्येष्ठ नागरिक संघाचे निर्माते नारायण गावडे यांच्या पत्नी होत्या. कसाल वझरेवाडी येथे राहणाऱ्या सौ लक्ष्मी गावडे यांनी बालसेविका म्हणून काम केले होते.त्यांचे पती नारायण गावडे यांनी ग्रामसेवक म्हणून आपली सेवा बजावली आहे. निवृत्तीनंतर त्यांनी जेष्ठ नागरिकांमध्ये काम करण्याचे निश्चित करून ज्येष्ठ नागरिक संघटनेची स्थापना केली होती. सौ लक्ष्मी यांनी त्यांना या कामांमध्ये मोलाचे सहकार्य केले होते. सौ लक्ष्मी यांचे सोमवारी उत्तर रात्री २ वाजता त्यांच्या राहत्या घरी निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्यावर वझरेवाडी येथील स्मशानभूमी मध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी समाजातील प्रतिष्ठित, ज्येष्ठ नागरिक, पत्रकार, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.