त्रिंबकमध्ये जलसंधारणाला लोकसहभागाची जोड!

जि. प. सदस्या वर्षा सांबारी यांच्या हस्ते वनराई बंधाऱ्याचा शुभारंभ; सरपंचांसह ग्रामस्थांचे उत्स्फूर्त श्रमदान

आचरा (प्रतिनिधी) : भविष्यातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जलसंधारणाच्या कामांना लोकसहभागाची जोड देत त्रिंबक येथे वनराई बंधारा उभारणीचा शुभारंभ करण्यात आला. जिल्हा परिषद सदस्या वर्षा सांबारी यांच्या हस्ते या उपक्रमाचा प्रारंभ झाला. यावेळी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी तसेच ग्रामस्थांनी उत्स्फूर्तपणे श्रमदान करून जलसंधारणाच्या कामाला सुरुवात केली.

त्रिंबकचे सरपंच किशोर त्रिंबककर, उपसरपंच सुचिता एकनाथ घाडीगावकर आणि ग्रामपंचायत अधिकारी माधुरी दाभोलकर यांच्या मार्गदर्शनाखाली वनराई बंधाऱ्याचे काम हाती घेण्यात आले आहे. पावसाचे पाणी अडविणे, गावातील जलस्रोत टिकवून ठेवणे तसेच भूजलपातळीत वाढ करणे, हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे.

या श्रमदानात ग्रामपंचायत सदस्य सागर सत्यवान चव्हाण, सपना तेली, नेहा वेंगुर्लेकर, संतोषी सावंत तसेच ग्रामपंचायत कर्मचारी विशाल मेस्त्री, अस्मि वर्देकर, ग्रीष्मा बागवे यांनी सहभाग घेतला.

तसेच ग्रामस्थ संतोष सावंत, सत्यवान परब, जयंत गोसावी, मंगेश सावंत भोसले यांच्यासह अनेक ग्रामस्थांनी श्रमदान करत बंधारा उभारणीच्या कामाला हातभार लावला.

लोकसहभागातून साकारला जाणारा हा वनराई बंधारा पावसाचे पाणी अडवून त्याचा साठा वाढविण्यासोबतच भूजलपातळी सुधारण्यास मदत करणार आहे. त्यामुळे भविष्यात गावातील पाणीटंचाई कमी होण्यास तसेच शेतीसाठी पाण्याची उपलब्धता वाढण्यास हातभार लागणार आहे. जलसंधारणासाठी ग्रामस्थांनी एकत्र येत केलेले हे श्रमदान गावाच्या पाणी सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल ठरत आहे.

error: Content is protected !!