शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले जि. प. सदस्य राजन चिके

मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह महायुती सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी; तातडीने सरसकट पंचनामे करून शासनाला अहवाल सादर करण्याच्या श्री चिके यांच्या कृषी अधिकाऱ्यांना सूचना

कणकवली (प्रतिनिधी) : कोरड्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर भातशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी फोंडाघाट चे जिल्हा परिषद सदस्य राजन चिके यांनी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचत वाघेरी, पियाळी, घोणसरी, लोरे नं. १ आणि गांगेश्वर परिसरातील दुष्काळग्रस्त भातपिकांची पाहणी केली. यावेळी पंचायत समिती सदस्या मानसी मराठे तसेच कृषी विभागाचे अधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थिती होती. पावसाने दडी मारल्याने भातपिकांना मोठा फटका बसला असून अनेक ठिकाणी भाताची रोपे करपण्याच्या स्थितीत आली आहेत. काही भागात पाण्याअभावी उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर राजन चिके यांनी शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. नुकसानग्रस्त क्षेत्राची पाहणी करताना शेतकऱ्यांनी दुष्काळी परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या समस्यांची माहिती दिली.

यावेळी राजन चिके यांनी कृषी अधिकाऱ्यांना नुकसानग्रस्त शेतीचे तातडीने सरसकट पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या. पंचनाम्याचे काम कोणत्याही प्रकारे प्रलंबित राहू नये तसेच प्रत्यक्ष शेतावर जाऊन वस्तुनिष्ठ नोंद करावी आणि पंचनाम्याचा अहवाल तातडीने शासनाकडे सादर करावा, असे त्यांनी स्पष्ट केले.
“मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह महायुती सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी”

यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधताना राजन चिके म्हणाले,
“आज बळीराजा अत्यंत कठीण परिस्थितीतून जात आहे. पावसाअभावी भातपिकांचे नुकसान होत असून शेतकऱ्यांच्या डोळ्यांसमोर वर्षभराची मेहनत वाया जाण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. मात्र शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नये. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. शेतकऱ्यांचे नुकसान शासनाच्या निदर्शनास आणून देण्यासाठी आम्ही प्रशासनासोबत प्रत्यक्ष बांधावर उतरलो आहोत.” ते पुढे म्हणाले, “नुकसानग्रस्त एकही शेतकरी पंचनाम्यापासून वंचित राहता कामा नये. कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी गावागावात जाऊन प्रत्यक्ष पाहणी करावी. सरसकट पंचनामे करून त्याचा अहवाल शासनाला तातडीने पाठवावा. शेतकऱ्यांना शासनाच्या मदतीचा लाभ मिळवून देण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल. बळीराजाच्या संकटाच्या काळात त्याच्या पाठीशी उभे राहणे हीच आपली प्राथमिकता आहे.”
दुष्काळी परिस्थितीची तीव्रता लक्षात घेऊन शासनाकडे वस्तुनिष्ठ अहवाल पाठविणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचेही चिके यांनी सांगितले. शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे आवश्यक कागदपत्रे व माहिती उपलब्ध करून देत पंचनाम्याच्या प्रक्रियेत सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.

वाघेरी, पियाळी, घोणसरी, लोरे नं. १ आणि गांगेश्वर परिसरात झालेल्या या पाहणीदरम्यान शेतकऱ्यांनी आपल्या समस्या राजन चिके यांच्यासमोर मांडल्या. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी केल्याने प्रशासनानेही तातडीने कार्यवाही करण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे शासनाच्या मदतीची अपेक्षा असलेल्या शेतकऱ्यांना या पाहणीमुळे काहीसा दिलासा मिळाला आहे. यावेळी जिल्हा माजी उपसभापती संतोष कानडे, लोरे नं 1 सरपंच अजय रावराणे, घोणसरी सरपंच प्रसाद राणे, पियाळी सरपंच प्रवीण पन्हाळकर, वाघेरी सरपंच अनुजा राणे, मंडळ कृषी अधिकारी श्रीम. झुलपे, उप कृषी अधिकारी श्रीम. वेंगुर्लेकर, ग्रामपंचायत अधिकारी राकेश गोवळकर, पोलिस पाटील अमित राणे, ग्राम पंचायत घोणसरी उपसरपंच अंकिता परब, पोलिस पाटील भालचंद्र राणे, ग्राम महसूल अधिकारी जी. व्हि. शिंदे, ग्रामपंचायत अधिकारी सिद्धेश गोसावी, विलास मराठे. एकनाथ परब, सुभाष परब, विश्वनाथ परब, बबन साळसकर , पियाळी उपसरपंच विजय मुरकर कृषी सहाय्यक निलेश कावले, ग्रामपंचायत सदस्य संजय ढवण, तन्वी गुरव. दामू नारकर, बाबु घाडी, सुनील वंजारे, विठोबा साळसकर, सुरेश तेली, दीपक गुरव, तुषार गुरव, शुभम गुरव, मंगेश सुतार, साहिल गुरव, रोहित गुरव, वाघेरी उपसरपंच स्नेहल नेवगे, तुकाराम गुरव सदस्य रविंद्र सावंत सदस्य अय्याज हवालदार ग्रामपंचायत अधिकारी अनंत राणे पोलिस पाटील विजय सावंत पोलिस पाटील गुरव पोलिस पाटील कावले कृषी सहाय्यक सचिन राणे ग्रामस्थ मंगेश नेवगे माजी ग्रामपंचायत सदस्य महेंद्र राणे ग्रामस्थ सुधाकर राणे ग्रामस्थ संजय राणे शेतकरी सुशांत सावंत शेतकरी दत्ताराम लाड शेतकरी आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!