चौके (प्रतिनिधी) : धामापूर खालचावाडा अंगणवाडी येथे गावनिहाय एकत्रित ९ वा राष्ट्रीय पोषण माह व सेवा संकल्प अभियान ३० सप्टेंबर रोजी विविध उपक्रमांनी उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. या कार्यक्रमास पंचायत समिती सदस्य रिया बावकर , धामापूर गावाचे सरपंच मानसी परब , उपसरपंच रमेश निवतकर व ग्रामपंचायत सदस्य तसेच एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प मालवण प्रकल्प अधिकारी उल्का खोत, बीट चौके १ च्या पर्यवेक्षिका सौ. भगत, अंगणवाडी सेविका-मदतनीस, पालक व लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान पंचायत समिती सदस्या रिया बावकर व धामापूर सरपंच मानसी परब यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन करून करण्यात आले त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन तसेच क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमास औपचारिक सुरुवात करण्यात आली. उपस्थित मान्यवरांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले, तर प्राथमिक शाळेतील मुलानी स्वागतगीत सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
आकर्षक उपक्रमांतून पोषणाचा संदेश
राष्ट्रीय पोषण माहच्या निमित्ताने अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी विविध माहितीपूर्ण व आकर्षक प्रदर्शनांची मांडणी केली होती. यामध्ये —
- ‘आपली अंगणवाडी, आपली जबाबदारी’ या संकल्पनेवर आधारित सेल्फी पॉइंट
- बालविकास क्षेत्र – मुलांसाठी सेल्फी पॉइंट
- ‘अक्षय पात्र’ – मुठभर धान्य
- ‘पोषणाची आगगाडी’ – मिनी परसबाग
- विविध स्थानिक रानभाज्यांचे प्रदर्शन
- संतुलित आहार मनोरा व त्यामध्ये विविध खाद्यपदार्थांची मांडणी
- बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी मुक्त खेळाचे कोपरे
- पोषणाचा संदेश देणारी आकर्षक रांगोळी
- विविध पौष्टिक खाद्यपदार्थांचे प्रदर्शन
या उपक्रमांची उपस्थित मान्यवरांनी पाहणी करून अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या उपक्रमशीलतेचे कौतुक केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मा. प्रकल्प अधिकारी श्री. उल्का खोत यांनी केले. यावेळी त्यांनी कार्यक्रमाचा उद्देश व पोषण माहच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली .
पंचायत समिती सदस्या सौ. रिया बावकर यांनी उपस्थितांना राष्ट्रीय पोषण माहच्या शुभेच्छा देत बालकांच्या पोषण, आरोग्य व सर्वांगीण विकासासाठी अंगणवाडीच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित केले. यावेळी उपस्थित इतर मान्यवरांनीही मार्गदर्शन केले.
‘आशीर्वादाचा व बदलाचा दिवा’ प्रज्वलित
यानंतर सेवा संकल्प अभियानांतर्गत लाभार्थ्यांच्या हस्ते ‘आशीर्वादाचा व बदलाचा दिवा’ प्रज्वलित करण्यात आला. या उपक्रमातून पोषण, आरोग्य आणि सकारात्मक बदलाचा संदेश देण्यात आला.
कार्यक्रमात उपस्थितांसाठी मनोरंजनात्मक खेळाचे आयोजन करण्यात आले. यामुळे कार्यक्रमात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
चिमुकल्यांचा ‘पोषण गौराई’ रॅम्प वॉक
कार्यक्रमाचे खास आकर्षण ठरले ते अंगणवाडीतील चिमुकल्यांनी सादर केलेले ‘पोषण गौराई’ रॅम्प वॉक. विविध पौष्टिक आहार व पोषणाचा संदेश देणाऱ्या संकल्पनांसह मुलांनी सादरीकरण करून उपस्थितांची दाद मिळवली शेवटी ‘पोषण आरती’ घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बीट चौके क्र. ०१ च्या पर्यवेक्षिका सौ. भगत मॅडम यांनी केले. कार्यक्रमासाठी धामापूर सरपंच यांनी राष्ट्रीय पोषण माहचे महत्त्व लक्षात घेऊन उपस्थितांसाठी पौष्टिक पुलावाचा अल्पोपहार उपलब्ध करून दिला.
अंगणवाडी सेविका, मदतनीस, ग्रामपंचायत, लाभार्थी, पालक व उपस्थित मान्यवरांच्या सहभागामुळे धामापूर येथील राष्ट्रीय पोषण माह व सेवा संकल्प अभियानाचा कार्यक्रम उत्साहात व जनजागृतीपूर्ण वातावरणात संपन्न झाला.












