आचरा (प्रतिनिधी) : महाराष्ट्र माऊली पूज्य साने गुरुजींचे २४ डिसेंबर २०२३ ते २४ डिसेंबर २०२५ हे वर्ष सर्वत्र ‘साने गुरुजी स्मृती अभियान’ म्हणून साजरे होत आहे. विविध संस्था विविध उपक्रम राबित आहेत. साने गुरुजी कथामाला मालवण विविध उपक्रमांनी हे अभियान साजरे करणार आहे त्याचा शुभारंभ ‘सांगूया कथा श्यामच्या आईच्या’ ह्या उपक्रमाने झाला. साने गुरुजींच्या ‘श्यामची आई’ पुस्तकातील निवडक रात्रींचे कथाकथन शिक्षकांनी मुलांना केले.
यावर्षी कथाकथन स्पर्धा, सेवामयी शिक्षक पुरस्कार, कथामाला मेळावे या उपक्रमांसोबतच आदर्श कथामाला शाखा गौरव, देवस्वरूप आई (मातृस्तवन गायन), व्यक्तिमत्व विकास शिबिर आदी कार्यक्रम साने गुरुजी कथामाला मालवण तालुका समिती सादर करणार आहे. पूज्य साने गुरुजींचा जन्म २४ डिसेंबर १८९९ रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील पालगड या गावी झाला. तर ११ जून १९५० रोजी मुंबईला गुरुजींनी आपला देह ईश्वराला समर्पित केला. ऊणेपुरे अर्ध्या शतकाचे आयुष्य! त्या आयुष्यात गुरुजींनी मुलांपासून पालकांपर्यंत, शेतकऱ्यांपासून शेतमजुरांपर्यंत, देशाच्या स्वातंत्र्यप्राप्तीपासून समाजकार्यापर्यंत अनेक उपक्रम राबवून कार्यकर्त्यांची एक फळी निर्माण केली.
साने गुरुजी कथामाला मालवण ही संस्था गेली पन्नास वर्षे कथाकथनाचे अनेक उपक्रम घेते. या अभियान अंतर्गत शाळा शाळांत जाऊन जवळजवळ साने गुरुजींची रूपे उलगडणार आहेत. त्यात अध्यापन हा धर्म मानणारे साने गुरुजी, कथाकथनकार साने गुरुजी, साहित्यिक साने गुरुजी, स्वातंत्र्य चळवळीला स्फूर्ती देणारे साने गुरुजी, कवी साने गुरुजी, प्रबोधनकार साने गुरुजी, भारतीय संस्कृतीचे उपासक साने गुरुजी, तत्त्वज्ञ साने गुरुजी आदी विविध रूपातील पूज्य साने गुरुजी मुलांपर्यंत पोहोचविण्याचा कथामालेचा उपक्रम असेल.
“भारतीय तत्त्वज्ञानाचे सहज सोपे रूप मांडून तत्त्वज्ञानाचा खरा अर्थ सांगणारे तत्त्वज्ञ साने गुरुजी पालकांपर्यंत पोहोचले पाहिजेत, यासाठी ‘साने गुरुजी व भारतीय संस्कृती’या पुस्तकाचा प्रसार-प्रचार कथामाला करणार आहे. अमृतपुत्र साने गुरुजींचे हे शतकोत्तरी रौप्य महोत्सवी जयंती अभियान विविध अंगाने साजरे करण्यात येईल,” असे सुरेश शा. ठाकूर, (अध्यक्ष साने गुरुजी कथामाला मालवण) हे आमच्या प्रतिनिधी सोबत बोलताना म्हणाले.