कणकवली शहरासह जिल्ह्यातील युवा पिढी होतेय बरबाद
सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : एका झटक्यात हजारो लाखो रुपये मिळतात या इझी इनकम च्या आशेने आपल्या मिळकतीचे किंवा व्याजी घेतलेले शेकडो, हजारो रुपये ऑनलाईन जुगारावर खेळून कणकवली शहरासह सिंधुदुर्ग जिल्ह्यातील युवा पिढी कफल्लक होत चालली आहे. मात्र या ऑनलाईन जुगाराकडे खाकी वर्दी चे होत असलेले दुर्लक्ष ऑनलाईन जुगार खेळवणाऱ्या एजंट ना दरदिवशी हजारो रुपये कमवून देत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हायवेवरील तालुका शहरात या ऑनलाईन जुगाराचे मुख्य एजंट असून मुंबई बांद्रा येथून ऑनलाईन जुगार ऑपरेट होत असल्याची चर्चा आहे. हा ऑनलाईन जुगाराचा सर्व व्यवहार ऑनलाईन आर्थिक देवाणघेवाणी तूनच होतो. कणकवली शहरातील ” प्रितम ” प्यारे, सर्वो ” त्तम ” तसेच सर्व काही सिद्धीस नेणारे” सिद्धेश ” सारखे एजंट शहर तसेच कणकवली तालुक्यातील युवा पिढीला , व्यावसायिकांना या ऑनलाईन जुगाराची सवय लावतात. तुमच्याकडे जुगार खेळायला पैसे नसले तरी पठाणी व्याजाने हे एजंट तुम्हाला जुगार खेळायला पैसेही देतात. आणि कधीतरी जुगारात पैसे मिळाले की जुगार खेळायची सवय लागल्यावर आपला खिसा कधी रिकामा झाला हेही ऑनलाईन जुगार खेळणाऱ्यांना लक्षात येत नाही. जुगार खेळण्यासाठी घेतलेले पैसे फेडण्यासाठी प्रसंगी आपल्या गाड्या , दागिने, मोबाईल या जुगार एजंट च्या हवाली करून कफल्लक व्हायची वेळ अनेकांवर आलेली आहे. एखादी दुर्घटना घडल्यानंतर या ऑनलाईन जुगारावर कारवाई करण्यापेक्षा पोलिसांनी वेळीच या ऑनलाईन जुगाराला आळा घालावा अशी मागणी पालकवर्गातून होत आहे.












