अन्यथा सात दिवसांनंतर पोलीस अधीक्षक कार्यालयाबाहेर तिव्र निदर्शने
मनसे वाहतूक सेनेने दिला इशारा
कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात मटका जुगार असे अवैध धंदे मोठ्याप्रमाणात सुरू आहेत. पोलीस प्रशासनाने ते तातडीने बंद करावेत अन्यथा सात दिवसांनंतर पोलीस अधीक्षक कार्यालयाबाहेर तिव्र निदर्शने केली जातील. असा इशारा मनसे वाहतूक सेनेच्यावतीने दिला आहे. गुरुवारी दुपारी त्यांनी शहर उपअधीक्षक कार्यालयावर रॅली काढून मागण्यांचे निवेदन दिले.
मनसेच्यावतीने दसरा चौकातून जुना बुधवार पेठे पर्यंत वाहनांची रॅली काढण्यात आली. यामध्ये रिक्षा, दुचाकींचा समावेश होता. शहर आणि करवीर उपअधीक्षक कार्यालयावर ही रॅली नेण्यात आली. तेथे अधिकारी उपस्थित नसल्यामुळे कर्मचारी दारात येवून उभे राहिले. त्यांच्या समोर पोलिसांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. तेथे मागणीचे निवेदन देण्यात आले. यामध्ये शहरातील जुना राजवाडा, शाहूपुरी, लक्ष्मीपुरी, राजारामपुरी, करवीर, गांधीनगर, शिरोली एम.आय.डी.सी., गोकूळ शिरगाव व इतर ठिकाणच्या पोलिस ठाण्याच्या हद्दीत दुकानात एक साईड बंद करून, पत्र्याच्या गाड्यावर, रस्त्याच्याकडेला छोटी पडदीमारून शहरातील झोपडपट्टीतील घरात सुद्धा मटका घेतला जात आहे. असे निवेदनात म्हटले आहे. यावेळी जिल्हा मुख्य संघटक राजू जाधव, भिमराव साखरे, प्रदीप जाधव, सागर पाटील, मोहसिन बागवान, राजू पठाण, पंकज शिरगावे, अंजना सुर्यवंशी, विजया पाटील, सरीता कराडकर यांच्यासह वाहतूक सेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.