माझं नाव उद्धव बाळासाहेब ठाकरे आमचा गट म्हणजे उबाठा नाही
मुंबई (प्रतिनिधी) : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर अंतिम निकाल जाहीर केला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गटच मुख्य शिवसेना असल्याचे निरीक्षण राहुल नार्वेकर यांनी नोंदवले आहे. तसेच, दोन्ही गटांचे आमदार पात्र ठरवले. निकालादरम्यान, राहुल नार्वेकर यांनी शिवसेनेच्या १९९९ सालच्या घटनेचा आधार दिला. तर, सुनिल प्रभूंचा व्हीप अवैध असल्याचे सांगून भरत गोगावलेंचा व्हीप राहुल नार्वेकरांनी मान्य केला आहे. दरम्यान, आजच्या या निकालानंतर उद्धव ठाकरे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधत आपला संताप व्यक्त केला आहे. तर कटकारस्थान रचून लोकशाहीची हत्या करण्यात आली आहे, असा आरोपही उद्धव ठाकरे यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर केला आहे.
निर्णयानंतर उद्धव ठाकरे यांनी राहुल नार्वेकरांवर सडकून टीका केली. स्वतः दोन तीन पक्ष बदलणाऱ्या नार्वेकरांनी पक्षांतर बंदी कायदा अधिक मजबूत करण्याऐवजी त्यांनी पक्षांतर कसं करावं याचा निर्णय दिला. विधानसभा अध्यक्षांना जे काही संरक्षण असतात त्याचा त्यांनी गैरवापर केला. शिवसेना कुणाची हे लहान मुलही सांगू शकतं, असे उद्धव ठाकरे म्हणाले. तसेच,नार्वेकरांना त्या ठिकाणी कशासाठी बसवण्यात आले, ते आता समोर आले आहे. सर्वोच्च न्यायालयाचे निकाल हे सर्वोच्च असतात, एक परिमान असते. पण नार्वेकरांनी सर्वोच्च न्यायालयाचे नियम धाब्यावर बसवले. त्यांच्या मागे महाशक्ती असल्यामुळे ते सर्वोच्च न्यायालयाच्य वर असल्याचे दाखवून दिले. शिवसेना कुणाची याचा निर्णय निवडणूक आयोगाचा निर्णय चुकीचा आहे. त्यावर सर्वोच्च न्यायालयात लढाई सुरू आहे. पण नार्वेकरांनी सर्वोच्च न्यायालयाचा अपमान केला, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले.
याचबरोबर, ‘उबाठा’ उल्लेखावर पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे संतापले. ते म्हणाले, “आमचा गट म्हणजे उबाठा नाही. माझं नाव उद्धव बाळासाहेब ठाकरे असं स्वच्छ आणि स्पष्ट नाव आहे. उबाठा, उबाठा काय? मग बाकीच्यांच्या आई-वडिलांची नावंही तुम्ही तशीच लावणार का? आणि उबाठा असेल तर या अन्यायाविरोधात मी उभा ठाकलेला आहे.