कणकवली (प्रतिनिधी) : अपघात टाळणे नक्कीच आपल्या हातात आहे. डिफेन्सिंग ड्रायव्हिंग हा महत्वाचा पर्याय आपल्याकडे आहे. त्यासाठी सीटबेल्ट, हॅल्मेटचा वापर करणे गरजेचे आहे. तर अपघात घडल्यानंतर जखमींना अवश्य मदत करा कारण, अशी मदत केली तरी आपल्याला संबंधित कोणतीही शासकीय यंत्रणा त्रास देऊ शकत नाही, असे कोर्टाचे आदेश आहेत. रस्त्यांच्या बाजूला विविध फलक, चिन्हे लावलेली असतात, त्याचे पालनही वाहन चालविताना करा, असे मार्गदर्शन मोटार वाहन निरीक्षक मनोज लोनारी यांनी केले.
तालुका प्रवासी संघ कणकवलीच्या वतीने येथील नगरवाचनालयाच्या सभागृहात राष्ट्रीय प्रवासी दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात श्री. लोनारी बोलत होते. यावेळी व्यासपिठावर सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड, उपअभियंता विनायक जोशी, तहसीलदार दीक्षांत देशपांडे, पोलीस उपनिरीक्षक सागर शिंदे, मोटार वाहन सहाय्यक निरीक्षक प्रितम पोवार, पद्मश्री परशुराम गांगावणे, प्रवासी संघाचे अध्यक्ष मनोहर पालयेकर आदी उपस्थित होते.
लोनारी म्हणाले, तुलना केली तर दिवसाची वाहतूक ७० टक्के व रात्रीची वाहतूक ३० असते, तरीही रात्रीचे अपघात जवळपास ७० टक्के घडतात. कारण, समोरून येणाऱ्या वाहनांच्या लाईट्स डोळ्यांवर पडतात. त्यातच हल्ली हॅलोजन लाईट्स वापरून समोरच्याला त्रास देण्याचेही प्रकार होतात. परिणामी अपघातांना निमंत्रण मिळते. रात्री झोपेचाही अंमल असतो. विशेषतः पहाटे ३ ते सकाळी ६ ही गाढ झोपेची वेळ असते. परिणामीही अपघात घडता, प्रवासी वाहनांच्या चालकांना रात्री प्रवास करावयाचा असल्याची कल्पना असते. ते दिवसा पुरेशी विश्रांती घेतात व रात्री वाहन चालवतात. सातत्याने वाहन चालवित असल्यामुळे त्यांना रस्त्यांचीही कल्पना असते. त्यामुळे नागरिकांनी लांबच्या प्रवासावेळी शक्यतो प्रवासी वाहनांचा वापर करावा.
लोनारी पुढे म्हणाले, खासगी वाहन चालविताना चारचाकी चालकाने सिटबेल्ट लावणे आवश्यक आहे. सिटबेल्ट नसेल तर अपघातात क्षणभरात डोके समोरील डॅशबोर्डवर आपटते व तेवढ्या वेळेमध्ये एअरबॅग्जही ओपन होत नाही. तसेच दुचाकीस्वाराने नेहमी हॅल्मेटचा वापर करावा. कारण, दरडावर आदळलेल्या टरबूजाची होते तशीच स्थितीत सिमेंटच्या रस्त्यावर आदळलेल्या दुचाकीस्वाराच्या डोक्याची होते. हॅल्मेटमुळे अन्य वाहनांचे आवाज ऐकू येत नसल्याच्या तक्रारी केल्या जातात, पण, चांगल्या दर्जाच्या हॅल्मेटमध्ये भोवतालच्या वाहनांचे अगदी ‘मायक्रो साऊंड ही ऐकायला येत असतात, अशी रचना केलेली असते. मात्र, हेल्मेटचा गळ्याखाली येणारा बेल्ट निट लावला पाहीजे, अन्यथा अपघातप्रसंगी हॅल्मेट उडून जाते व त्याचा काहीच उपयोग होत नाही.
संबंध रस्ताभर आपल्याला वेगवेगळी चिन्हे दिसत असतात. प्रत्येक चिन्ह आपल्याला काही ना काही माहिती देत असते. मात्र, रस्त्यांच्या कडेला दिसणाऱ्या स्पिडब्रेकर, शाळा, वळण या सगळ्या बोर्ड, चिन्हांकडे आपण दुर्लक्ष करतो. यातील काही चिन्हे अशीही आहेत की तेथे नियम मोडल्यास कायदेशीर कारवाईही होते. त्यामुळे वाहनचालकांनी त्याबाबतीतही दक्ष रहावे. १८ वर्षापेक्षा लहान मुलांच्या हातात पालक कौतुकाने वाहनाचे स्टेअलिंग, हँडल देतात. याच कारणामुळे मुलांची लहान वयातच वाहनाने ओढ वाढते. ते वाहन चालविण्याचा हट्ट धरतात, पण, लहान मुलांच्या माध्यातून अपघात घडला तर त्याची शिक्षा त्याच्या पालकांना देण्याची कायद्यात तरदूत आहे. त्यामुळे पालकांनीही काळजी घ्यावी, असे लोनारी म्हणाले.
अपघातप्रसंगी मदतीला सगळेच इच्छुक असतात. आपल्यामुळे अपघातग्रस्ताचे प्राण वाचवेत, यापेक्षा मोठे सुख कोणतेही नसते. पण, मदत केल्यानंतर पोलिसांचा ससेमिरा मागे लागेल, अशी भिती मदत करू इच्छिणाऱ्याच्या मनात असते. मात्र, न्यायालयाच्या ‘गाईडलाईन्स’ आहेत की, अपघातग्रस्ताला मदत करणाऱ्या नागरिकाचे नावही विचारण्याचा अधिकार संबंधित शासकीय यंत्रणेला नाही. त्यामुळे अपघात घडलेला दिसला तर अपघातग्रस्तांना नक्की मदत करा. जखमीला रुग्णालयात नेण्यासाठी १०८ रुग्णवाहिकेला फोन करा, जखमीचा रक्तस्त्राव होत असल्यास १०४ क्रमांकावर संपर्क साधा, जेणेकरून रक्ताची सोयही होऊ शकेल. जखमीला प्रथम तासाभरात होणारी मदत सोनेरी मानली जाते. कारण, त्याच मददतीमुळे जखमीचे प्राण वाचू शकतात, असेही लोनारी म्हणाले.
अजयकुमार सर्वगोड म्हणाले, तालुका प्रवासी संघाने अतिशय सुंदर कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. समाजासाठी झटणारी ही मंडळी आहे. या देशाचे दरडोई उत्पन्न वाढायला हवे, त्यासाठी प्रत्येकानेच जबाबदारी उचलायला हवी. दीक्षांत देशपांडे म्हणाले, आज या कार्यक्रमामध्ये मोटार वाहन निरीक्षक यांनी केलेले मार्गदर्शन अतिशय महत्वाचे आहे. येत्या काळात शाळा, महाविद्यालयांमध्ये वाहतूकविषय जनजागृतीसाठी आपण प्रयत्नशील असल्याचे सर्वगोड म्हणाले. विनायय जोशी म्हणाले, अपघातांचे प्रमाण आपल्याकडे जास्त आहे. मात्र, सर्वांनीच काळजी घेतली तर अपघातांचे प्रमाण कमी होऊ शकते. परशुराम गंगावणे यांनीही अपघातांचे प्रमाण कमी होण्याची अपेक्षा व्यक्त केली.
कार्यक्रमात पद्मश्री परशुराम गांगावणे, पत्रकार गणपत उर्फ भाई चव्हाण, साहित्यिका तथा शिक्षिका सरीता पवार, सामाजिक कार्यकर्ते राजस रेगे, पोलीस कर्मचारी राजाराम पाटील, रिक्षाचालक महेंद्र उर्फ राजू चिंदरकर, स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. ज्ञानेश्वर दुर्भाटकर, एसटी चालक संदीप शिरोडकर, स्वच्छताविषयक कामगिरी करणारे किशोर तांबे यांना पुरस्काराने गौरविण्यात आले. यावेळी मृणाल ठाकूर – पालयेकर यांच्यासह अनेकांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी रोटरीचे अध्यक्ष रवी परब, तालुका पेन्शनर्स संघटनेचे अध्यक्ष सीताराम उर्फ दादा कुडतरकर, भालचंद्र मराठे, संजय मालंडकर, ज्येष्ठ पत्रकार अशोक करंबेळकर, सुगंधा देवरुखकर, सुभाष राणे, प्रवासी संघाचे सचिव विलास चव्हाण, रमेश जोगळे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन श्रद्धा कदम, आयेशा सय्यद, पूजा सावंत यांनी केले












