सामाजिक संस्थाच्या कार्याला चंदनवाडी हनुमान मंदिर ट्रस्टचे योगदान
चंदनवाडी हनुमान मंदिर ट्रस्टकडून हनुमान जन्मोत्सव उत्साहात साजरा
खारेपाटण (प्रतिनिधी) : देशवासियांचे लाडके दैवत बलोपासक श्रीराम भक्त हनुमान जन्मोत्सव देशभर उत्साहात साजरी झाला. मुंबईतील चंदनवाडी हनुमान मंदिर ट्रस्टनेही श्री.हनुमान जन्मोत्सव सालाबाद प्रमाणे उत्साहात साजरा केला. १ एप्रिल,१९५४ रोजी स्थापन झालेल्या या हनुमान मंदिराच्या स्थापनेला यंदा ७० वर्षे पुर्ण झाली. हनुमान जन्मोत्सवा निमित्ताने स्वामी विरंगुळा जेष्ठ नागरिक केंद्र , परेल या सर्व जेष्ठ नागरिक गायक असलेल्या वाद्यवृंदाचा सुश्राव्य भाव गीत व भक्ती गीत गायनाचा कार्यक्रम संपन्न झाला.
यामधे राजरत्न कदम, गणेश करलकर, वंदना भारोडेकर, मारूती पेडणेकर, शैलजा काळे, सुरेश पवार , उल्हास हरमळकर ,सुनिता पारकर, रमेश सावंत या गायक गायिकांनी हनुमान ,प्रभू श्रीराम यांच्या वरील सुरेल गीतांचे गायन केले.तर त्याला दत्ताराम घाडी व राजरत्न कदम,(हार्मोनियम) शैलैश तूम्मा ( ढोलकी) नंदकिशोर आरोंदेकर ( कि-बोर्ड) , गणेश करलकल (तबला) यांनी संगीताची साथ दिली.
हनुमान जयंतीच्या निमित्ताने चंदनवाडी हनुमान मंदिर ट्रस्टने रस्त्यावरील निराधार वंचितांच्या पुनर्वसनासाठी कार्य करणारी संदिप परब यांची जीवन आनंद संस्था आणि जय साटेलकर यांची युनिक ब्लड मोटिव्हेटर्स या संस्थाच्या कार्याचा सन्मान करून त्यांना आर्थिक सहाय्याचे चेक सुपुर्द करण्यात आले.
मंदिर ट्रस्टच्या वतीने धार्मिक विधी कार्याबरोबरच समाज हिताच्या कार्याला आवर्जुन व नेमाने योगदान दिले जाते. यामधे समाजसेवी संस्थाना सहाय्य , कर्करूग्ण ग्रस्तांना सहाय्य, रक्तदान शिबिरांचे आयोजन इ.प्रकारचे योगदान करण्यात येते अशी माहिती अध्यक्ष सुबोध तावडे व खजिनदार अनिल तावडे यांनी दिली. त्यांनी उपस्थीतांचे स्वागत केले. तर सूत्र संचालन अनिल तावडे यांनी केले.
संस्थेचे विश्वस्त व सचिव सुधीर साळवी , विश्वस्त भालचंद्र कोलगे, सिताराम वाडेकर, ईश्वर शिंदे व प्रताप चौहाण यांचेसह भक्तमंडळी व पुजारी सुरेश शिदोरे व सहाय्यक संजय मालगुंडकर हे मंदिराच्या कार्यक्रम उपक्रमांत महत्वाची भुमिका पार पाडीत आहेत.












