चला जपू कौटुंबिक जिव्हाळ्याचा ध्यास
वैभववाडी (मंदार चोरगे) : भारत महासत्तेकडे वाटचाल करत असताना भारतात टेक्नॉलॉजी चा वापर मोठ्या प्रमाणात वाढलेला दिसत आहे. संगणकीकरण व यांत्रिकीकरण झपाट्याने वाढत असल्यामुळे मानवी श्रमाची कामे व वेळ यांची खूप मोठ्या प्रमाणात बचत होत आहे. मानवी श्रम वाचल्यामुळे पूर्वी दैनंदिन घरगुती कामातून व व्यावसायिक क्षेत्रात होणारी शारीरिक हालचाल व नकळत होणारा व्यायाम आज बंद झाला आहे. यामुळे लठ्ठपणा व अन्य शारीरिक समस्यांना अनेक व्यक्तींना सामोरे जावे लागत आहे. याबरोबर वाचलेल्या वेळेचे सुयोग्य नियोजन अथवा योग्य वापर फार कमी प्रमाणात दिसून येतो जास्तीत जास्त व्यक्ती हा वेळ मोबाईल टी.व्ही., सोशल मीडिया यावर खर्च करताना दिसतात. कोरोनाच्या काळात तर ऑनलाईन शिक्षणामुळे मोबाईलचा वापर प्रचंड प्रमाणात वाढलेला आहे. वेगवेगळ्या रिल्स बनविणे, स्टेटस अपलोड करणे, इंस्टाग्राम वर स्टोरी मेंन्शन करणे, तासणतास मोबाईलवरील गेम्स खेळणे अशा अन्य बाबींमध्ये आजचा युवा वर्ग आपला अमूल्य वेळ निरर्थकपणे वाया घालवताना दिसत आहे. तर दुसरीकडे टी.व्ही. वरील प्रसारित होणाऱ्या मनोरंजनाच्या कार्यक्रमांमध्ये काहीजण हा वेळ व्यतीत करताना दिसतात. मनोरंजन हे मानवी जीवनास अत्यंत आवश्यक आहेच. परंतु टी.व्ही वरील धार्मिक व मनोरंजनाचे काही मोजके कार्यक्रम सोडले तर आज अनेक मराठी वाहिन्यांवर दिवसेंदिवस नव्या नव्या कौटुंबिक मालिका प्रदर्शित होत आहेत. या कौटुंबिक मालिकांमधून अनेक नातेसंबंध चुकीच्या पद्धतीने दाखविण्याचा जोरदार प्रयत्न चाललेला दिसतो. चॅनल्स मधील ही एक स्पर्धाच म्हटल्यास वावगे ठरणार नाही. काही वर्षांपूर्वीपासून सासू – सून यांच्या विचारात, वागण्यात, आचरणात असलेला विरोधाभास मालिकांमधील अनेक प्रसंगातून प्रदर्शित केलेला पाहायला मिळत होता आज ते प्रमाण वाढलेले आहेच शिवाय कुटुंबातील महिला महिलांमधील कटकारस्थाने, भांडणे अशा गोष्टी प्रत्येक मालिकेत पूर्वीपासून प्रदर्शित केल्या जात आहेत. परंतु हल्ली टीव्हीवरील काही मालिकांमध्ये एका स्त्रीची तीन-तीन लग्न, एका पुरुषाचे अनेक स्त्रियांबरोबरचे संबंध, घराघरातील नात्यात प्रेम प्रकरणे, अनेक वेळा गुंगीचे औषध व विषप्रयोग केल्याचे प्रसंग, घरातील पैसे- दागिने यांची चोरी, कौटुंबिक कलह दर्शविणारे अनेक प्रसंग, पुनर्जन्म, अपहरण, अपघात, अनेक वाईट प्रलोभने, तोकड्या कपड्यात वावरणारे महिला पुरुष कलाकार असे प्रसंग जवळपास सर्वच मालिकांमध्ये अगदी प्रकर्षाने दाखविण्याचा प्रयत्न आज होत आहे. काही दिवसांपासून तर टीव्हीवर घटस्फोटाचे काही प्रसंग चुकीच्या पद्धतीने दाखविण्याचा प्रयत्न होताना दिसत आहे कलर्स मराठी वाहिनीवर १० जून पासून सुरू होणाऱ्या ‘अंतरपाट’ नावाच्या मालिकेमध्ये लग्न समारंभ उरकल्यावर भर लग्न मंडपात नवरी मुलीकडे घटस्फोटाची मागणी करणारा वर (मुलगा) दर्शविण्यात आलेला आहे. असा मालीकेचा ट्रेलर सध्या वाहिनीवर प्रदर्शित होत आहे तर यापूर्वीपासून सुरू असलेल्या एका मालिकेमध्ये कॉन्ट्रॅक्ट मॅरेज दाखवले आहे. परदेशातील हे प्रकार या मालिका चित्रपटांमधून प्रदर्शित करून भारतीय संस्कृतीवर घाला घालण्याचा हा प्रयत्न होताना दिसत आहे. एकंदरीत या सर्व गोष्टीचा विचार करता या कौटुंबिक मालिकांमधून नेमका काय बोध समाजाने घ्यावा हे कळत नाहीच शिवाय मनोरंजनाच्या नावाखाली कौटुंबिक कलह नातेसंबंधाचे विद्रूप चित्रीकरण प्रदर्शित करणाऱ्या मालिका पाहणे कितपत योग्य आहे याचे प्रेक्षक वर्गाने गांभीर्याने अवलोकन करणे गरजेचे आहे. आज या कौटुंबिक मालिका कुटुंबासोबत पाहताना आपल्या लहान मुलांवर व कुटुंबातील इतर व्यक्तींवर नकळत का होईना याचा परिणाम होताना दिसत आहे. एकीकडे सुसंस्काराच्या बढाया मानणारे पालक या अशा मालिका लागल्यावर सायंकाळी सात ते दहा टीव्ही समोरून हालत सुद्धा नाहीत असे आजचे चित्र आहे.
पर स्त्रीला माते समान मानणारे छत्रपती शिवराय, बहुजनांचे आधारवड लोकराजा राजर्षी शाहू महाराज,मागासवर्गीय समाजाला अभिमानाने जगायला शिकवणारे, घटनेचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर, स्त्री शिक्षणाचे जनक महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, राजा राम मोहन रॉय, लोकमान्य टिळक अशा कित्येक समाज सुधारकांनी जुन्या अनिष्ट चालीरीती परंपरा यामध्ये गुरफटलेल्या भारतीय समाजाला योग्य दिशा देण्यासाठी आपले संपूर्ण जीवन समर्पित केले त्या समाजसुधारकांचे विचार कार्य यांना आपण तिलांजली तर देत नाही ना ? याचा विचार प्रत्येक भारतीयाने करणे गरजेचे आहे. महाराष्ट्राची मराठी संस्कृती , संतांची भूमी, शूरवीरांची भूमी असे महाराष्ट्रात राहून सांगताना प्रत्येकाची छाती अभिमानाने गर्वाने फुलून येते परंतु आपल्या मराठी संस्कृतीच्या पूर्णपणे विरोधी प्रथा, प्रसंग यांचे प्रदर्शन मांडणाऱ्या मालिका, चित्रपट पाहताना आपण आपली संस्कृती बासणात गुंडाळून ठेवत आहोत का.? त्या मालिका, चित्रपटात काम करणारे मराठी कलाकार पैशांसाठी प्रसिद्धीसाठी सध्या वाटेल ते करताना दिसत आहेत मराठी चित्रपटांचे भरकटलेले कथानक अर्ध नग्न अवस्थेतील अनेक अभिनेत्रींची लज्जास्पद दृश्ये ,कृत्ये व संवाद तर मराठी मालिकांमधून महाराष्ट्राच्या सुसंस्कृत परंपरा चालीरीती यांना पायदळी तुडवत दाखवण्यात येणारे किळसवाणे चित्रण महाराष्ट्राच्या संस्कृतीला, महाराष्ट्राच्या युवा वर्गाला, महाराष्ट्राच्या नव्या पिढीला, विनाशाकडे घेऊन जात आहे. महाराष्ट्राची मराठी संस्कृती या किळसवाण्या नव्या मालिका चित्रपटांच्या विळख्यात सापडलेली आहे. हे असेच चालू राहिल्यास महाराष्ट्रात या कौटुंबिक मालिकांमुळे अनेक कुटुंबात नात्यात द्वेष व कलह निर्माण होणार आहेत व परिणामी अनेक कुटुंब उध्वस्त होणार आहेत गेल्या काही वर्षांपूर्वी दारूमुळे उध्वस्त होणारी कुटुंबे वाचवण्यासाठी महिला वर्गाने दारूबंदीसाठी महाराष्ट्रात गावागावात उग्र आंदोलने व मोर्चे काढून अनेक दारूची दुकाने कायमची बंद केली व अनेक संसार वाचवले त्याची पुनरावृत्ती म्हणून कौटुंबिक कलह, गैरचित्रण प्रदर्शित करणाऱ्या मालिका बंद करण्याबाबत देखील एक चळवळ महाराष्ट्रातील सर्वच स्तरांतून उभारणे काळाची गरज बनली आहे असे मला वाटते. मनोरंजनाच्या नावाखाली चाललेला हा गैरप्रकार थांबवण्यासाठी प्रेक्षकांच्या डोळ्यात अंजन घालण्याचा एक छोटासा प्रयत्न मी या लेखातून केला आहे.