कणकवली महाविद्यालयात अर्थशास्त्र अभ्यासक्रमाची कार्यशाळा संपन्न
कणकवली (प्रतिनिधी) : मुंबई विद्यापीठ अर्थशास्त्र अभ्यास मंडळाने विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला संधी दिली असून बदलत्या काळानुसार अभ्यासक्रमात नाविन्यपूर्ण बदल करुन जागतिक स्तरावरील घडामोडीचा वेध घेऊन अभ्यासक्रम तयार केला आहे. अर्थशास्त्र या विषयातील तत्वे आणि व्यवहार यांची उत्तम सांगड घालण्याचा मुंबई विद्यापीठाचा संकल्प आहे असे प्रतिपादन ज्येष्ठ अभ्यासक तथा मुंबई विद्यापीठ अर्थशास्त्र अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ. सुरेश मैंद यांनी केले. मुंबई विद्यापीठ अर्थशास्त्र अभ्यास मंडळ व कणकवली कॉलेज अर्थशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने येथील कणकवली महाविद्यालयात नवीन शैक्षणिक धोरण- २०२० प्रथम वर्ष वर्गाची पुनर्रचित अभ्यासक्रमाची कार्यशाळा नुकतीच पार पडली. कार्यशाळेच्या उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव विजयकुमार वळंजू उपस्थित होते.
आप्पासाहेब पटवर्धनांचे अर्थशास्त्राचे प्रयोग मोलाचे विजयकुमार वळंजू
यावेळी मार्गदर्शन करताना शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव विजयकुमार वळंजू मार्गदर्शन करताना म्हणाले की, कोकणातील फलोद्यान, काजू व अन्य फळ प्रक्रिया उद्योगावर अधिक संशोधन होणे गरजेचे आहे. कणकवलील गोपुरी आश्रमाचे संस्थापक अप्पासाहेब पटवर्धन हे अर्थशास्त्राचे प्राध्यापक होते. त्यांनी खऱ्या अर्थाने चलनशुद्धीसारखे अर्थशास्त्राचे मोलाचे प्रयोग राबवले”
या कार्यशाळेत अर्थशास्त्र अभ्यास मंडळाचे सदस्य डॉ. बालाजी सुरवसे, डॉ.अनंत लोखंडे, डॉ. विलास गायकर, डॉ. काशिनाथ चव्हाण व डॉ. अरुण चव्हाण इत्यादी अभ्यास मंडळाच्या सदस्यांनी पुनर्रचित अभ्यासक्रमाचे स्वरूप व कार्यपद्धती याविषयीची माहिती उपस्थित प्राध्यापकांना दिली. पुढे मार्गदर्शन करताना डॉ. सुरेश मैंद म्हणाले की, यापुढील काळात कुठलाही विषय स्वतंत्रपणे एकक म्हणून अभ्यासता येणार नाही. अभ्यासक्रमाचे स्वरूप आंतरविद्याशाखीय झाल्यामुळे कला, वाणिज्य, विज्ञान अशा सर्व शाखेतील विद्यार्थ्यांना अर्थशास्त्रामध्ये करिअरच्या संधी उपलब्ध होणार आहेत. पुनर्रचित अभ्यासक्रमामध्ये वर्गातील अध्यापनाबरोबरच वर्गाबाहेरी निरीक्षण व प्रकल्प कार्याला महत्व देण्यात आले आहे. त्यामुळे विद्यार्थी केवळ ज्ञानकेंद्रित न होता अनुभव केंद्रित होईल. शहरी व ग्रामीण अशा कोणताही भेद न करता विद्यार्थ्यांना रोजगाराभिमुख बनवण्यासाठी नवीन शैक्षणिक धोरण अत्यंत सकारात्मक आहे” सर्वप्रथम मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. कणकवली महाविद्यालयाच्या वतीने डॉ. सुरेश मैंद यांचा शाल, श्रीफळ, सन्मान चिन्ह व महाविद्यालयाचा अंक देऊन सत्कार करण्यात आला.
या कार्यशाळेत रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील २८ प्राध्यापक प्रतिनिधी उपस्थित होते. प्राध्यापक प्रतिनिधींच्या वतीने प्रा. आनंद कांबळे रत्नागिरी व प्रा. मल्लेश खोत, मालवण, प्रा. कुणकेरकर यांनी मनोगत व्यक्त केले. सर्व प्राध्यापकांना उपस्थित मान्यवर, प्र. प्राचार्य युवराज महालिंगे व मुंबई विद्यापीठ सिनेट सदस्य डॉ.सोमनाथ कदम, कार्यशाळेचे समन्वयक प्रा. सचिन दर्पे आदी मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्रे वितरित करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. मनीषा सावंत यांनी केले व शेवटी आभार डॉ.बी. एल. राठोड यांनी मानले. या कार्यशाळेसाठी महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.