किरण उर्फ भैय्या सामंत यांनी केळवली येथील कार्यक्रमात केली पोलखोल
राजापूर लांजा साखरपा विधानसभा मतदारसंघात बेरोजगारीचा प्रश्न आहे, घरे बंद पडत चालली आहेत, युवकांचे स्थलांतर होत आहे
ही परिस्थिती आपल्याला बदलायची आहे
रत्नागिरी (प्रतिनिधी) : राजापूर तालुक्यातील वाटुळ येथे उभारण्यात येणाऱ्या मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल उभारणी बाबत किरण उर्फ भैय्या सामंत यांनी मोठा खुलासा केला आहे. मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचा पाठपुरावा आपण करावा अशी प्रेरणा स्थानिक आमदार राजन साळवी यांच्या स्वीय सहाय्यक यांनीच दिली. दिपक नागले आणि स्वीय सहाय्यक माझ्याकडे आले आणि या हॉस्पिटलचा प्रश्न माझ्याकडे मांडला अशी पोलखोल किरण उर्फ भैय्या सामंत यांनी केली आहे.
राजापूर केळवली जिल्हा परिषद गट पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम होता त्यावेळी किरण उर्फ भैय्या सामंत यांनी आपले मनोगत व्यक्त केले. ते आपल्या मनोगतात म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून जो आज आपण शिवसेनेत पक्ष प्रवेश केलाय त्याबद्दल मी आपल्या सगळ्याचे अभिनंदन करतो. विकासाच्या दृष्टीने किंवा कोणत्याही अडीअडचणीच्या वेळेस मी एक कार्यकर्ता म्हणून मी आपल्या पाठीशी सदैव उभा असेन अशी ग्वाही देतो. राजापूर लांजा साखरपा विधानसभा मतदारसंघातील लोकं ही भोळी भाबडी आहेत. त्याचाच गेल्या पंधरा वर्षे गैरफायदा घेतला जात आहे. विकासाचे राजकारण न करता भावनिकतेचे राजकारण केले जात आहे. त्यामुळे मी आपणा सगळ्यांना शब्द देतो की मी खरं सांगेन जे काम होण्यासारखे आहे ते होईल असे म्हणेन जे होणार नाही ते स्पष्ट पणे होणार नाही असे सांगेन. परंतु मी कुणाची फसवणूक करणार नाही. राजापूरच्या मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल वरून राजकारण केले जात आहे. मात्र या मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल उभारणीसाठी प्रेरणा देण्यासाठी दिपक नागले सर्वप्रथम आले. त्यांच्यासोबत स्थानिक आमदार राजन साळवी यांचे स्विय सहाय्यक आले होते. त्या स्विय सहाय्यकाने मला सांगितले की मागील दहा वर्षे या हॉस्पिटलचा पाठपुरावा करत आहोत पण यश येत नाही त्यामुळे आता तुम्ही पाठपुरावा करावा. त्यानंतर मी पाठपुरावा सुरू केला.
त्यानंतर राज्याचे अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, आरोग्य मंत्री तानाजीराव सावंत, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, यांचे सहकार्य मिळाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सात दिवसात मंजुरी दिली. या हॉस्पिटलचे भूमिपूजन येत्या काही दिवसातच होईल. इमारत बांधकाम योजना, घरेलु कामगार योजना या मागील बारा वर्षे चालू होत्या मात्र या योजनांची प्रभावी अंमलबजावणी झाली नाही. शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या मुळे जास्तीत जास्त नोंदणी होऊ शकली त्यामुळे या योजनांच्या लाभार्थ्यांना आकडा चार हजारांपर्यंत गेला. आज रत्नागिरीत सुमारे पन्नास हजार कोटींपर्यंत गुंतवणूक होत आहे. अनेक कंपन्या उद्योग येत आहेत. तीच परिस्थिती आपल्या राजापूर लांजा साखरपा विधानसभा मतदारसंघात निर्माण करायची आहे. इथे बेरोजगारीचा प्रश्न आहे. तरुण लोक गावातून मुंबईकडे स्थलांतरित होतात. ही परिस्थिती आपल्याला बदलायची आहे. त्यासाठी मला तुमची साथ हवी आहे असे आवाहन सिंधुरत्न समृध्द योजनेचे सदस्य, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष आणि शिवसेना नेते किरण उर्फ भैय्या सामंत यांनी केले.
राजापूर तालुक्यातील केळवली जिल्हा परिषद गटाचा पन्हाळे येथे पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम होता. यावेळी किरण उर्फ भैय्या सामंत यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमावेळी पक्ष निरीक्षक संदेश पटेल, अपूर्वा किरण सामंत, विधानसभा क्षेत्र प्रमुख राजू कुरूप, उपजिल्हा प्रमुख अशपाक हाजू, तालुका प्रमुख दिपक नागले, विभाग प्रमुख नाना कोरगावकर, तालुका संघटक भरत लाड, महिला उप तालुका प्रमुख सौ. धनश्री शिंदे, उपविभाग प्रमुख अजित घाणेकर, संतोष सरवणकर, महिला उपविभाग प्रमुख अंकिता अंबोले आदी पदाधिकारी उपस्थित होते.