शिक्षण मंत्र्यांच्याच जिल्ह्यात नियोजित शासकीय रेखाकला परिक्षेच्या कालावधीत क्रिडा अधिकारी यांचा खेळ खंडोबा

शासकीय रेखाकला परिक्षा व जिल्हा क्रीडा स्पर्धा एकाच दिवशी; जिल्ह्यातील अनेक विद्यार्थ्यांना याचा बसणार फटका

विद्यार्थी हित लक्षात घेऊन शिक्षण मंत्री व शिक्षक आमदार यात लक्ष घालणार का? याकडे विद्यार्थी व शिक्षकांचे लक्ष

वैभववाडी (प्रतिनिधी) : दरवर्षी प्रमाणे कला संचालनालय महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या वतीने संपूर्ण राज्यात घेण्यात येत असलेल्या शासकीय रेखाकला परिक्षेच्या आयोजन व तारखांबाबत दि.१६-०७-२०२४ रोजी परिपत्रक निर्गमित करण्यात आले आहे. त्यानुसार संपूर्ण महाराष्ट्रात दि.२५ सप्टेंबर २०२४ ते २८ सप्टेंबर २०२४ या कालावधीत शासकीय रेखाकला परिक्षा पार पडणार आहेत. असे पुर्व नियोजित असताना देखील दुसरीकडे मात्र सिंधुदुर्ग जिल्ह्यात क्रिडा अधिकारी यांनी या कालावधीतच जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन केले आहे. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना या क्रीडा अधिकाऱ्यांच्या या आडमुठ्या धोरणाचा फटका बसणार आहे. शिक्षण मंत्र्यांच्याच जिल्ह्यात नियोजित शासकीय परीक्षेच्या कालावधीत जिल्हा क्रीडा अधिकारी यांचा मनमानी नियोजनाचा हा खेळ खंडोबा पाहून अनेक पालक व शिक्षक अचंबित झाले आहेत.

कोल्हापूर विभागामध्ये सिंधुदुर्ग सोबत सातारा सांगली कोल्हापूर रत्नागिरी व सांगली मनपा कोल्हापूर मनपा असे सात संघ असतात सिंधुदुर्ग वगळता बाकीच्या जिल्ह्यांमध्ये स्पर्धांना १५ ऑगस्ट नंतर सुरुवात झालेली आहे सिंधुदुर्ग जिल्ह्याला मात्र एवढी घाई का ? हा पालकांना व शिक्षकांना न सुटणारा प्रश्न पडलेला आहे. ४९ अनुदानित खेळाच्या स्पर्धांना सिंधुदुर्ग जिल्ह्यात २२ जुलै पासून सुरुवात झालेली आहे त्यातल्या आज पर्यंत ३८ स्पर्धा पार पडल्या असून आता राहिलेल्या अकरा स्पर्धा पार पाडण्यासाठी एवढी घाई का ? ज्या जिल्ह्यांनी विभागीय स्पर्धा अचानक नियोजन लावले आहे त्या जिल्ह्याच्या संबंधित अधिकाऱ्यांशी बोलून स्पर्धा दोन चार दिवस पुढे ढकलल्यास हा घोळ राहणार नाही. गणेशोत्सव तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या नैसर्गिक स्थितीचा व अभ्यास जिल्हा क्रीडा अधिकारी करावा शिवाय शासकीय रेखाकला परीक्षांमध्ये सहभागी विद्यार्थी या सर्व गोष्टी विचारात घेऊन जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी शासनाच्या २५ सप्टेंबर ते २८ सप्टेंबर २०२४ रोजी होणाऱ्या क्रिडा स्पर्धांचे आयोजन रद्द करुन नवीन वेळापत्रक जाहीर करावे जेणेकरून विद्यार्थी रेखाकला परिक्षा व क्रीडा स्पर्धा या दोन्ही मध्ये सहभागी होऊ शकतील अशी मागणी विद्यार्थी पालक शिक्षक या सर्वांकडून होत आहे. दरवर्षी अशा धोरणांमुळे कित्येक मुले शासकीय रेखाकला परिक्षा व क्रीडा स्पर्धांपासून वंचीत रहातात. दोन महीने आधी परीक्षेचे वेळापत्रक येऊन सुद्धा या परीस्थितीत बदल होताना दिसत नाही. या प्रकरणी शिक्षण मंत्री दिपक केसरकर व शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे लक्ष घालून विद्यार्थी हित जोपासणार का ? याकडे पालक व कला व क्रीडा शिक्षक वर्गाचे लक्ष लागून राहिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!