कोल्हापूर (प्रतिनिधी) : कळंबा येथील डॉक्टर दांपत्याच्या घरातील पंधरा तोळे आठ ग्रॅम वजनाचे ८ लाख ४५ हजार रुपयांच्या दागिने चोरीचा छडा लावण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला यश आलं. यामध्ये प्रसाद रघुनाथ माने(वव २०, सुर्वे नगर, कळंबा) याला अटक करण्यात आली असून त्याच्याकडून चोरीचा माल हस्तगत करण्यात आलाय. त्याच्यावर करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. आदिनाथ नगर कळंबा रोड इथं राहणारे डॉक्टर दिपाली सुभाष ताईंगडे यांच्या घरी फेब्रुवारी ते एप्रिल या दरम्यान अज्ञात चोरट्यानं पंधरा तोळे आठ ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला मारला होता. या संदर्भात करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता. पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी दिलेल्या सूचनेनुसार या गुन्ह्याच्या अनुषंगानं स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू होता. पथकानं घटनास्थळी भेट देऊन गुन्हा घडलेली पद्धत व फिर्यादी यांच्या घरामध्ये काम करणारे कामगार यांची गोपनीय माहिती मिळवून तपास सुरु केला होता. यामध्ये घरात कामास येणारा प्रसाद माने याने ही चोरी केल्याचं उघडकीस आले. तो गुजरी इथं चोरीचे दागिने विक्रीसाठी येणार असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला मिळाली. यानुसार सापळा रचून प्रसाद माने या तरुणास ताब्यात घेण्यात आले. सुरुवातीला त्यानं उडवडीची उत्तरं दिली.मात्र, त्याला अधिक विश्वासात घेऊन विचारलं असता त्यानं गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्याकडून पंधरा तोळे आठ ग्रॅम वजनाचे ८ लाख ४५ हजार रुपयांचे दागिने जप्त करण्यात आले असून त्याच्यावर करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन मसुटगे, पोलीस अंमलदार वैभव पाटील, गजानन गुरव, प्रवीण पाटील, संतोष बरगे, प्रदीप पाटील, विशाल खराडे, महिंद्र करवी यांच्या पथकानं केली.