तळेरे येथील सलुन व्यावसायिक दाजी कदम यांचे पाच हजार रुपयांचे पैशाचे पाकीट केले परत
तळेरे (प्रतिनिधी) : तळेरे येथील सलुन व्यावसायिक तसेच आदर्श व्यापारी संघटना तळेरेचे माजी सेक्रेटरी संतोष उर्फ दाजी कदम यांचे पाच हजार रुपयांच्या रक्कमेने भरलेले पैशाचे पाकीट दोन बहुरूपी कलाकारांना सोमवारी रात्री सापडले होते. त्यांनी मंगळवारी सकाळी आदर्श व्यापारी संघटना तळेरेच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधून सदरील पैशाचे पाकीट दाजी कदम यांच्याकडे प्रामाणिकपणे परत केले.
बहुरूपी कलाकार शिवाजी विलास इंगवले व संजय विलास इंगवले राहणार- वायफळे, तालुका- तासगाव, जिल्हा- सांगली यांना सोमवारी रात्री आठ वाजता बँक ऑफ महाराष्ट्र तळेरे या ठिकाणी संतोष गोविंद कदम (दाजी) यांचे पैशाचे पाकीट पडलेले सापडले होते. त्यामध्ये त्यांची महत्त्वाची कागदपत्रे देखील होती. त्यावरून पाकीट हरविलेल्या व्यक्तीची ओळख पटली. त्यांचा प्रामाणिकपणा बद्दल व्यापारी संघटनेच्या वतीने त्या दोन्ही बहुरुप्यांचे अभिनंदन करण्यात आले. याप्रसंगी आदर्श व्यापारी संघटनेचे अध्यक्ष प्रवीण वरुणकर, सेक्रेटरी आदित्य महाडिक, खजिनदार आप्पा कल्याणकर, राजू पिसे, वसंत बिद्रे, पोलीस पाटील चंद्रकांत जाधव हे उपस्थित होते.