कोल्हापूर(प्रतिनिधी) : डोळ्यांसाठी धोकादायक ठरणारा संभाव्य धोका लक्षात घेऊन गणेश विसर्जन मिरवणुकीत लेसर लाईट्सच्या वापरास अप्पर जिल्हा दंडाधिकारी संजय तेली यांनी गुरुवार दि. १२ सप्टेंबर ते मंगळवार दि.१७ सप्टेंबर २०२४ पर्यंत बंदी आदेश जारी केलाय. यामुळं विसर्जन मिरवणुकीत लेसर लाईट्सचा वापर करणा-या मंडळांवर कारवाई केली जाणार.
कोल्हापूर जिल्हयामध्ये गणेशोत्सव सण मोठ्या उत्साहानं साजरा केला जातो. तसंच सार्वजनिक गणेश मंडळाकडून मोठ्या प्रमाणात मिरवणुकांचं आयोजनही केलं जातं. मिरवणुकांमध्ये लेसर लाईटचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. उचगांव परीसरातील मणेरमळा इथं श्री गणेश मुर्ती च्या आगमन मिरवणुकीवेळी मिरवणुक बघण्याकरीता आलेल्या भाविकांच्या डोळ्यांवर लेसर लाईट पडल्यानं डोळयाचा पडदा तसंच बुबळाला इजा झाल्याचं निदर्शनास आलं. ऑप्थल्मोलॉजिकल सोसायटी कोल्हापूरचे अध्यक्ष डॉ. चेतन खारकांडे यांनी लेसर लाईट टाकण्यास बंदी घालणेची मागणी केली होती. तसंच कोल्हापूरातील नागरिकांनी, नियंत्रण कक्षाला फोन करुन लेसर लाईट बंद करावी अशा तक्रारी केल्या आहेत. तक्रारींचा वाढता ओघ आणि लेसर लाईट्चा धोका लक्षात घेऊन अखेर अप्पर जिल्हा दंडाधिकारी संजय तेली यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ च्या कलम १६३ (१) नुसार गणेश विसर्जन मिरवणुकीत लेसर लाईट्सवर बंदी घालण्याचा गुरुवारी निर्णय घेवून बंदी आदेश जारी केले. या आदेशाचे पालन करण्याच्या सूचनाही पोलिसांना दिल्या आहेत.