निराधार वयोवृध्द बांधवाला मिळाला संविता आश्रमचा आधार
खारेपाटण (प्रतिनिधी) : सुहास कृष्णकांत आंगणे हे वय वर्षेः६५ हे निराधार गृहस्थ नुकतेच स्वतःहून आश्रय आणि संरक्षणासाठी पणदूरच्या संविता आश्रमात दाखल झाले.मुळ मालवणच्या आंगणेवाडीतील असलेले व सद्या रत्नागिरी जिल्ह्यात वास्तव्य असलेल्या सुहास आंगणे यांना निराधारांसाठी कार्य करणा-या जीवन आनंद संस्था आणि संस्थेच्या संविता आश्रमची माहिती मिळाली. सदर माहितीवरून शोध घेत त्यांनी पणदूर गाठले.व स्वतःहून ते आश्रमात दाखल झाले.निराधार असल्याची आवश्यक पडताळणी करून त्यांना नुकतेच संविता आश्रमात दाखाल करून घेण्यात आले.
रत्नागिरीतील निर्मल ग्रामपंचायत खानू मधून देण्यात आलेला निराधार असल्याचा दाखला सुहास आंगणे यांनी यावेळी आश्रमात सबमिट केला.जीवन आनंद संस्थेच्या आश्रमांत समाजातील निराधार, वयोवृध्द, शारिरीक व मानसिक दृष्टीने आजारी असलेले बांधव विविध पोलीस स्टेशन्स व संवेदन नागरिकांमार्फत दाखल होत असतात.तर काही वेळा निराधार बांधव स्वतःहूनही आश्रमचा पत्ता शोधत आश्रमात आश्रयासाठी येत असतात. जीवन आनंद संस्थेचे संस्थापक संदिप परब आणि संस्थेच्या आश्रमांतील कार्यकर्त्यांनी गेल्या ११ वर्षांमधे केलेल्या सेवाभावी कार्याची माहिती सिंधुदुर्ग, मुंबई, पालघर, गोवासह सर्वदूर पोहचली आहे.व पोहचत आहे.